प्रकाश आवाडे उद्या करणार अर्ज दाखल!

इचलकरंजी आमदारकीच्या कारकिर्दीत इचलकरंजी विधानसभा मतदार संघ समृद्ध केला आहे. त्याचप्रमाणे एकदाच खासदारकीची निवडणूक लढवून हातकणंगले लोकसभा मतदार संघाचा विकसित देशाच्या धर्तीवर कायापालट करून हा देशातील आदर्शवत मतदार संघ करायचा आहे. आणि त्यासाठी जनता मला नक्कीच साथ देईल, असा विश्वास आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्ताने ताराराणी पक्ष कार्यालयात पदाधिकारी व कार्यकत्यांना मार्गदर्शना करताना आमदार आवाडे बोलत होते.

मंगळवार १६ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने तयारीला लागावे असे आवाहनही त्यांनी केले. हातकणंगले मतदारसंघ विकासाचा मुद्दा आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी लोकभावनेचा आदर करुन मी निवडणूकीत उतरलो असून आपण महायुती अथवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विरोधात नसून त्यांच्यासोबत होतो, आहे आणि पुढेही राहणार असेही आमदार आवाडे यांनी सांगितले.
.