आणूर-बस्तवडे दरम्यान वेदगंगा नदीपात्रात बुडणाऱ्या शाळकरी मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात चौघे बुडाले.बस्तवडे (ता. कागल) बंधाऱ्यात ही घटना काल (शुक्रवार) दुपारी घडली. जितेंद्र विलास लोकरे (वय ३६, रा. मुरगूड, ता. कागल), रेश्मा दिलीप यळमल्ले (३४), हर्ष दिलीप यळमल्ले (वय १७, दोघेही रा. अथणी, कर्नाटक) व सविता अमर कांबळे (२७, रा. रुकडी, ता. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत. यातील तिघांचे मृतदेह सापडले असून, हर्षचा मृतदेह शोधण्याचे काम दुपारपासून सुरू केले होते. रात्री नऊ वाजेपर्यंत त्याचा मृतदेह सापडला नव्हता.
रात्र झाल्याने आज सकाळी मृतदेह शोधण्याचे काम बचाव पथक करणार आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मृतांत मुरगूडच्या जितेंद्र लोकरे, त्यांची बहीण, बहिणीचा मुलगा आणि मामाच्या मुलीचा समावेश आहे. आणूर गावच्या यात्रेसाठी हे सर्वजण आले होते. काल दुपारच्या सुमारास ते गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या वेदगंगा नदीकडे गेले होते. काळम्मावाडी धरणाचे पाणी सोडल्याने वेदगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे व पाण्याला वेग होता. यावेळी ते कपडे धुण्यासाठी, तसेच अंघोळीसाठी नदीत उतरले.
हर्ष हा खोल पाण्यात बुडताना आरडाओरड करत होता.शेजारी असणारा मामा जितेंद्र पाण्यात उतरला आणि त्याच्या पाठोपाठ रेश्मा, साधना व सविताही उतरल्या. मात्र, पाण्याचा प्रवाह आणि भीतीपोटी एकमेकांना घट्ट मिठी मारल्याने सारे नदीत बुडाले. नदीच्या काठावर जितेंद्र लोकरे यांच्या १२ वर्षांच्या आरोही या मुलीने त्यांना पाण्यात बुडताना पाहिले.
तिने जोरात आरडाओरडा केल्यावर नदीकाठावर मासे पकडण्यासाठी आलेल्या बस्तवडे येथील अवधूत वांगळे यांनी गावातीलच प्रमोद पाटील याला बोलावून प्रसंगावधानता राखत नदीत उड्या घेतल्या. साधना लोकरे यांना वाचविण्यात त्यांना यश आले; तर तिघांचे मृतदेह त्यांनी नदीकाठावर आणले. हर्ष याला शोधण्याचे काम रेस्क्यू पथकाने दुपारपासून सुरू केले. मात्र, रात्री नऊ वाजेपर्यंत तो सापडला नव्हता. रात्र झाल्याने शोध कार्य थांबवले. आज सकाळी मृतदेह शोधण्याचे काम रेस्क्यू पथक करणार आहे.