सांगलीचा खासदार कोण होणार? यावर पैज लावलेल्या दोघाना अशी पैज लावणे चांगलेच अंगलट आलं आहे. गाड्यांची पैज लावणाऱ्या दोघांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेजण हे कवठेमहांकाळ तालुक्यातील आहेत. सांगली लोकसभा निवडणुकीच्या निकालात आपलाच उमेदवार विजयी आणि खासदार होईल यावर दुचाकीची पैजा लावणाऱ्या कवठेमहांकाळ तालुक्यातील या दोघांवर पोलिसांनी धडक कारवाई केली. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याखाली रमेश संभाजी जाधव (वय 29, रा. बोरगाव) आणि गौस मुबारक मुलाणी (वय 38, रा.शिरढोण) या दोघावर हा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी बोरगाव, शिरढोण येथील दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन लाख पंधरा हजाराच्या दुचाकी जप्त केल्या. बोरगाव येथील ग्रामपंचायत सदस्य रमेश संभाजी जाधव आणि शिरढोणचे गौस मुबारक मुलानी यांनी सांगली लोकसभा निवडणुकीचा निकालाबाबत भाजप पक्षाचा उमेदवार निवडून येईल की अपक्ष उमेदवार निवडून येईल यासाठी स्वतःच्या फायद्यासाठी निवडणुकीतील उमेदवारावर बुलेट एमएच-10-डीएफ-1126 व दुचाकी एमएच-10-डीएच- 8800 गाड्यावर पैजा लावल्या होत्या. पैज लावून तसा संदेश सोशल मीडियाद्वारे प्रसारित केला होता.
पैजा लावल्याची माहिती पोलिस निरीक्षक जोतीराम पाटील यांना समजताच त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी दोघांवर कारवाई करत रमेश संभाजी जाधव आणि गौस मुबारक मुलाणी यांना ताब्यात घेत दोघांच्या दोन्ही दोन लाख पंधरा हजाराच्या दुचाकी जप्त केल्यात.सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील आणि भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विजयावरुन पैजा लागल्या आहेत. अपक्ष उमेदवार विशाल पाटील निवडून आले तर रमेश संभाजी जाधव यांच्याकडून यूनिकॉर्न गाडी गौस मुबारक मुलाणी यांना देण्यात येईल. तसेच भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील निवडून आले तर गौस मुबारक मुलाणी यांचेकडून बुलेट गाडी रमेश संभाजी जाधव यांना देण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केले आहे. मात्र, हे त्यांच्या चांगलच अंगलट आलं आहे.