ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी तगडा बंदोबस्त!

लोकसभा निवडणुका निर्धोक पार पडाव्यात यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघात पोलीस, राज्य राखीव दल आणि केंद्रीय औद्योगिक दलाच्याही तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदारसंघांमध्ये १५ हजारांहून अधिक पोलिस बंदोबस्त तैनात राहणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

ठाणे शहर पोलिस आयुक्तालयात सध्या पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह चार अतिरिक्त पोलिस आयुक्त, सात पोलिस उपायुक्त यांच्यासह 8 हजार पोलिसांचे संख्याबळ आहे. तिन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये बाहेरील जिल्ह्यांमधून अतिरिक्त तीन पोलिस उपायुक्त नऊ सहायक पोलिस आयुक्त आणि १९ निरीक्षक, तसेच नाशिक प्रशिक्षण केंद्रातील ८० प्रशिक्षण उपनिरीक्षक, पिंपरी- चिंचवडमधील ६९० अंमलदार, तीन हजार ४९१ होमगार्ड असा सात हजारांहून अधिकचा फौजफाटा आहे.