कोल्हापुरात आंबा महोत्सव..

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, विभागीय कार्यालय, कोल्हापूर यांच्या मार्फत 19 ते 23 मे दरम्यान कोल्हापूर आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.भारत हौसिंग सोसायटी हॉल, राजारामपुरी, कोल्हापूर’ याठिकाणी आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाची वेळ चार दिवस सकाळी ९ ते रात्री ९ असणार आहे.कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, रायगड या जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी या महोत्सवात 32 स्टॉल मांडले आहेत.

प्रदर्शनात महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या आंब्याच्या 47 जातींचे प्रदर्शन मांडले आहे. या आंबा महोत्सवाचे उद्घाटन ग्राहकांच्या प्रचंड गर्दीत पहिल्या दिवशी संपन्न झाले.कोल्हापुरकरांना सुद्धा हापूसचा आनंद चार दिवस घेता येणार आहे. कोल्हापुरातील नागरिकांना थेट उत्पादक शेतकऱ्यांकडून आंबा खरेदी करता येणार आहे.आंबा महोत्सवामध्ये प्रति डझन 300 ते 700 रुपये दराने आंबा उपलब्ध आहेत. विक्रीसाठी हापूस व केशर आंबे उपलब्ध आहेत.

विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून, शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा हा या महोत्सवांचा प्रमुख उद्देश असतो.महोत्सवामध्ये रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, पायरी केसर व इतर विविध जातीचे आंबा उत्पादक शेतकरी वेगवेगळ्या जिल्ह्यातून सहभागी झाले आहेत.ग्राहकांना भौगोलिक मानांकन प्राप्त कोकणातील अस्सल हापूस आंबा उत्पादकांकडून आंबा उपलब्ध होणार आहे.अगदी काही ग्रॅम पासून दोन ते तीन किलो वजनाचे 47 आंब्यांचे प्रकार या ठिकाणी पाहण्यासाठी ठेवण्यात आले आहेत.