विधानसभा निवडणुकीसाठी पक्षांमध्ये जागेसाठी चुरशी लागली आहे. प्रत्येक पक्षातून अनेक नेते मंडळींनी आपापली इच्छा जाहीर केली आहे. त्यामुळे कोणाला विधानसभेची उमेदवारी मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. नूतन खासदार विशाल पाटील यांचा आठवड्यापूर्वी सांगलीत मेळावा झाला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष व पलूस-कडेगावचे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जनतेने भरभरून मदत केली आहे. कार्यकर्त्यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे. काँग्रेस पक्षाकडे जिल्ह्यातील पलूस – कडेगाव, सांगली, जत, मिरज, खानापूर आटपाडी अशा पाच जागा मागणार आहे. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशी सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या होत्या.
या मेळाव्यानंतर उध्दवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी खानापूर आटपाडी आणि जत विधानसभा मतदारसंघावर उध्दवसेनेचाच दावा आहे. या जागेवर अन्य कुणीही दावा सांगू नये, अशी मागणी केली होती. चार दिवसांपूर्वी सांगलीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील म्हणाले, वाळवा, शिराळा आणि तासगाव-कवठेमहांकाळ येथे आमच्याच पक्षाचे आमदार आहेत. आता जिल्ह्यातील आणखी तीन जागा पक्षाला मिळवाव्या लागतील. यासाठी मिरज, जत व खानापूर आटपाडीतील कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे. एकुणच सांगली जिल्ह्यातील जत, मिरज व खानापूर आटपाडी या तीन विधानसभा मतदारसंघांत काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि उध्दवसेना या पक्षांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना तयारीच्या सूचना दिल्या आहेत. यावरून विधानसभा जागा वाटपापूर्वीच महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कुरघोड्यांचे राजकारण चांगलेच तापले आहे.