इचलकरंजी महापालिकेकडून अनधिकृत नळ जोडणीची शोधमोहीम राबवण्यात येणार आहे.पाणीपुरवठा विभाग यासाठी कर विभागाची मदत घेणार आहे. या वेळी नळ जोडणीबाबतची सर्वंकष माहिती संकलित केली जाणार आहे. त्यातून नळ जोडणीची नेमकी संख्या समजणार आहे. याशिवाय अनेक महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.माहिती पत्र भरून घेणार शहरात सुमारे ५६ हजार मिळकतधारक आहेत. तर नळ जोडणीचे प्रमाण ४० हजार इतके आहेत. त्यामुळे अनधिकृत नळ जोडणीचे प्रमाण जास्त असावेत,
अशी शंका महापालिका प्रशासनाला आहे. त्यामुळे नळ जोडणी तपासणी मोहीम हातात घेतली आहे. ही तपासणी करताना एक माहिती पत्र भरून घेतले जाणार आहे. त्यामध्ये नळ जोडणीची परवानगी तपासली जाणार आहे. प्रत्येक घरामध्ये जाऊन स्वतः कर्मचारी माहिती घेणार आहेत. या तपासणीमध्ये एका परवनगीने एकाच नावावर किती नळ जोडणी घेतले आहेत, हे समजणार आहे.अनधिकृत नळ जोडणी आढळल्यास त्यावर पुढील कार्यवाही ठरवण्यात येणार आहे. यामध्ये दंडात्मक कारवाई केल्यानंतर नळ कनेक्शन अधिकृत करण्याचे धोरण राबवण्याबाबत महापालिका प्रशासन विचार करीत आहे.
यामुळे महापालिकेचा महसूल वाढण्यास मदत होईल. अनेक ठिकाणी एक इंची नळ जोडणी घेण्यास मंजुरी घेतली आहे. प्रत्यक्षात दीड अथवा दोन इंची नळ जोडणी घेतली असल्यास त्याची माहिती या तपासणी मोहिमेतून मिळणार आहे. याशिवाय निवासी व बिगर निवास वापर याचाही पर्दाफाश होणार आहे. अनेक ठिकाणी घरगुती नळ जोडणी घेतली असून वापर मात्र उद्योग अथवा व्यापारी कारणांसाठी केला जात आहे. अशा अनेक बाबी या तपासणी मोहिमेतून पुढे येत आहेत.