इचलकरंजी, नांदणी येथील जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील महादेवी हत्तीणीला परत द्यावे या मागणीसाठी सकल दिगंबर जैन समाज इचलकरंजी व भगवान महावीर जयंती उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील प्रांत कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. तत्पूर्वी झालेल्या सभेत महादेवी हत्तीणी परत येईपर्यंत लढा चालूच ठेवण्याचा निर्धार महावीर भवन येथे झालेल्या बैठकीत करण्यात
आला.
नांदणी येथील मठात गेली ३५ वर्षे असणाऱ्या महादेवी या हत्तीणीला गुजरात येथील वनतारा प्रकल्पात नेण्यात आले आहे. त्या विरोधात तीव्र जनभावना निर्माण झाली असून याबाबत विचारविनिमय करून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी येथील महावीर भवन या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत आणि प्रास्ताविक भगवान महावीर उत्सव मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. हत्तीणीचा लढा हा फक्त जैन समाजापुरता न राहता तो सकल मानवाचा आहे. त्यामुळे या लढ्यामध्ये सर्वच घटक सहभागी होत असल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केले.
आमदार राहुल आवाडे यांनी, महादेवी हत्तीणीला नेऊन समाजाच्या भावना दुखावण्याचे काम करण्यात आले आहे. पेटा आणि वनताराच्या अधिकाऱ्यांनी केलेले हे कारस्थान अत्यंत निंदनीय असे आहे.आमचा हत्ती नेऊ नका अशी भावना व्यक्त करताना झालेल्या प्रकाराबाबत ज्या युवकांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, त्या संदर्भात प्रशासनाशी बोलणे सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा झाली आहे. कोणत्याही स्थितीत शासनाच्या वतीने महादेवीला परत आणण्यासाठी योग्य भूमिका मांडली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी सकल दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष गुंडाप्पाण्णा रोजे, चंद्रकांत पाटील, सौरभ शेट्टी, शशिकला बोरा, महावीर जैन, बाबासो हुपरे, सुभाष बलवान, श्रीकांत चंगेडिया, शेखर शहा, डॉ. संजय खोत, संजय पाटणी, विजय गिरमल, दिलीप मुथा, बाळासाहेब कलागते उपस्थित होते.
बैठकीनंतर मुख्य मार्गावरून मूकमोर्चा काढण्यात आला. शिष्टमंडळाच्यावतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली. प्रांताधिकारी यांना भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये जैन समाजातील नेते व विविध संस्थांचे पदाधिकारी यांचा समावेश होता.
अंबानी समूहाच्या वनतारा प्रकल्पामध्ये हत्तीणीला नेल्यानंतर या समूहाच्या विविध उत्पादनावर बहिष्कार घालण्यास सुरुवात करण्यात आली आहे. लोकलढ्यातील हे सगळ्यात मोठे आंदोलन यशस्वी होत असून आत्तापर्यंत २० हजारहून अधिक लोकांनी जिओचे सिम पोर्ट केल्याचे यावेळी विविध वक्त्यांनी सांगत महादेवीला परत आणेपर्यंत लढा चालूच ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला.
