रोटरी क्लब च्या वतीने आज पोलिओ दिनानिमित्त रॅली

मंगळवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी पोलिओ दिनानिमित्त रोटरी क्लब रॅली काढणार आहे. तसेच शाळांमध्ये पोलिओ लसीकरण व्हिडीओ क्लिप मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये दाखविण्यात येणार आहे. शिवाय वर्तमानपत्रे, तसेच फेसबुक, व्हॉट्सअॅपद्वारे सोशल मीडियावरही जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ सांगोला चे अध्यक्ष रो. डॉक्टर साजिकराव पाटील यांनी दिली.

रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या प्रांतपाल रो. स्वाती हेरकळ यांनी महाराष्ट्रातील ११ प्रशासकीय जिल्यामध्ये हे उपक्रम एकाच वेळी राबवण्यात यावे असे सूचित केले आहे. पोलिओ कोणत्याही वयात संभवू शकतो. पण, प्रामुख्याने पाच वर्षांखालील मुलांमध्ये त्याची जास्त प्रमाणात लागण होऊ शकते. लसीकरण करून पोलिओवर मात करणे शक्य आहे. या पार्श्वभूमीवर रोटरीने १९८५ मध्ये जागतिक पोलिओ निर्मूलनासाठी पुढाकार घेऊन पोलिओ प्लस कार्यक्रम सुरू केला.

लसीकरण माध्यमातून पोलिओ निर्मूलन करण्यात रोटरीचे मोठे योगदान आहे. रोटरीने १.६ अब्ज डॉलर्स खर्च करून अगणित स्वयंसेवकांमार्फत १२२ देशांमधील २.५ अब्जाहून अधिक मुलांचे लसीकरण केले आहे. ग्लोबल पोलिओ निर्मूलन संस्थेतही रोटरीचा सहभाग आहे. पोलिओच्या रुग्णसंख्येत १९८० पासून ९९.९ टक्के घट झाली आहे. आज अफगाणिस्तान, नायजेरिया आणि पाकिस्तान तीन देशांमध्ये पोलिओचे रुग्ण आढळत असून, जगभरात २०१५ मध्ये ७५ पेक्षा कमी रुग्ण आढळले होते.

अन्य संस्थांसह रोटरीने पोलिओ निर्मूलनासाठी उभ्या केलेल्या प्रत्येक डॉलरसाठी बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशन एकास एक प्रमाणात ३५ दशलक्ष डॉलर्सची मदत या वर्षात करणार आहे. हा निधी वैद्यकीय कर्मचारी, प्रयोगशाळा उपकरणे, आरोग्य कर्मचारी आणि पालक आणि शैक्षणिक साहित्य इत्यादींसाठी वापरला जाईल. रोटरीचे सदस्य युनिसेफ आणि इतर भागीदारांबरोबर विविध भागातील तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत असल्याचे रोटरीच्या अध्यक्षांनी सांगितले.