दानवेंना मुख्यमंत्री शिंदेंचा टोला….

महाराष्ट्रात होऊ घातलेला 50 हजार कोटींचा उद्योग मध्य प्रदेशात गेल्याचा दावा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विटच्या माध्यमातून केला होता.यावर मराठवाड्यातील दुष्काळ सदृश्य स्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी अंबादास दानवे यांना आरोप करायला काय लागतं, असे म्हणत प्रत्त्युतर दिले.

मुख्यमंत्री शिंदे Eknath Shinde म्हणाले, आरोप करायला काय लागतं, परदेशी गुंतवणुकीत महाविकास आघाडीच्या काळात पाचव्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्राला आम्ही पहिल्या क्रमांकावर आणले आहे. कुठलाही उद्योग महिनाभरात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात नसतो. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्योगपतींच्या खाली बॉम्ब लावले जायचे. आम्ही उद्योगांसाठी रेड कार्पेट टाकले आहे, असा टोलाही त्यांनी अंबादास दानवे यांच्या टीकेवर लगावला.

संभाजीनगरात आढावा बैठकीसाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, वेदांताचा प्रकल्प गुजरातला गेल्यावर त्यांनी असेच आरोप केले होते. आमचे सरकार येऊन तेव्हा जेमतेम दोन महिनेच झाले होते. एवढ्या कमी कालावधीत उद्योग येत किंवा जात नसतो. एखादा उद्योग राज्यात आणायचा असेल तर त्याला अनेक महिने आधी तयारी करावी लागते. दोन वर्षात या राज्यात आम्ही कोट्यवधीचे उद्योग आणले. परदेशी गुंवतणुकीत महाविकास आघाडी सरकराच्या काळात चौथ्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आम्ही एक नंबरला आणला. औद्योगिक विकासाठी पोषक वातावरण असलेले राज्य म्हणून आपली ओळख आहे.उद्योगांना आवश्यक पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी, मनुष्यबळ मुबलक प्रमाणात आपल्याकडे आहे म्हणून उद्योग येत आहेत, असा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

आधी लोक उद्योगपतींच्या खाली बॉम्ब लावून पळून जायचे. आता ते होत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीला लगावला. आता आम्ही उद्योजकांना सुरक्षितता, रेड कार्पेट दिले आहे. सिंगल विंडो क्लिअरन्स त्यासोबतच आमचे सरकार सबसिडी देत आहे. परिणामी उद्योग मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येत आहेत आणि भविष्यातही येतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.