सोलापूरात एनटीपीसीची वीजनिर्मिती ५० टक्क्यांवर येणार

दक्षिण सोलापूर तालुक्यात आहेरवाडी, फताटेवाडी परिसरात असलेल्या एनटीपीसी प्रकल्पालाही पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. या प्रकल्पासाठी उजनी जलाशयातून पाणीपुरवठा होतो. जलाशयाची पाणीपातळी घटत असल्याने एनटीपीसी प्रकल्पातून आगामी काळात एकूण क्षमतेच्या ५० टक्केच वीजनिर्मिती होईल, अशी भीती एनटीपीसीने व्यक्त केली आहे.
या बाबतची माहिती एनटीपीसीच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आली आहे.

सोलापुरातील एनटीपीसी प्रकल्प हा कोळसा आधारित आहे. याठिकाणी १ हजार ३२० मेगावॉट वीजनिर्मिती केली जाते. या ठिकाणी निर्माण होणारी वीज महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यांनाही पुरविली जाते. या प्रकल्पासाठी उजनी धरणात थेट जलवाहिनी टाकली आहे. या प्रकल्पासाठी उजनी धरणातून वर्षाला दीड टीएमसी पाणी घेतले जाते.

यावर्षी उजनी धरण शंभर टक्के न भरल्याचा फटका शेतकरी, सर्वसामान्य, पाणी पुरवठा योजना सहन करावा लागत आहे. तसाच फटका आता एनटीपीसीलाही बसला आहे. धरणातील पाणी पातळी कमी होत असल्याने आगामी काळात एनटीपीसीमधून क्षमतेच्या पन्नास टक्के म्हणजे ६०० ते ६५० मेगावॉट एवढीच वीजनिर्मिती होण्याची शक्यता आहे.