रेशन दुकानातील पॉश मशीनवर बोटांचे ठसे न उठणाऱ्यांनाही धान्य मिळण्यासाठी आय स्कॅनरसह फोरजी पॉश मशीन वाटपास शुक्रवारी सुरुवात झाली. शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांना जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्याहस्ते मशीनचे वाटप झाले.शनिवारपासून जिल्ह्यातील सर्व दुकानदारांना मशीन वाटपाला सुरुवात होणार आहे.३१ मे अखेर जिल्ह्यातील सर्व १६७२ रेशन दुकानदारांना मोफत मशीन देण्यात येणार आहे. यामुळे जून महिन्यातील धान्य नव्या मशीनमधून होणार आहे. मशीनवर बोटाचे ठसे आले नाहीत तर आय स्कॅनरवरून धान्य वाटप करण्यात येणार आहे.
स्वस्त धान्य दुकानातून दर महिन्याला धान्य घेण्यासाठी पॉश मशीनवर थंब करणे बंधनकारक आहे. धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकतेसाठी ही पध्दती कार्यान्वित आहे. पण हाताने कष्टाची कामे केल्याने काही महिला व पुरुषांच्या हाताचे ठसे नाहीसे झाल्याने मशीनवर ठसे उमटत नसत. परिणामी त्यांना धान्यापासून वंचित राहावे लागत होते. म्हणून शासनाने फोरजी आयस्कॅनरसही ई पॉश मशीन देत आहे. त्याचे वितरण सुरू झाले.दरम्यान, आज शनिवारी करवीर, गडहिंग्लज, रविवारी पन्हाळा, आजरा, सोमवारी हातकणंगले, भुदरगड, मंगळवारी इचलकरंजी, राधानगरी, बुधवारी शिरोळ, कागल तर गुरुवारी गगनबावडा तालुक्यातील रेशन धान्य दुकानदारांना मशीनचे वाटप करण्यात येणार आहे.