मोहिते पाटलांच्या मदतीने आयुष्यात कुठलीही निवडणूक लढवणार नाही; राम सातपुतेंची घोषणा

आयुष्यात यापुढे मोहिते पाटलांची मदत घेऊन हा राम सातपुते कुठलीही निवडणूक लढवणार नाही. हा माझा पण आहे. एकवेळ राजकारण सोडेन, घरात बसेन. पण, मोहिते पाटलांच्या मांडीला मांडी लावून आयुष्यात कधीच बसणार नाही.ज्या दिवशी तसं घडेल, त्याच दिवशी हा राम सातपुते राजकारणात नसेल, असे चॅलेंज माजी आमदार राम सातपुते यांनी दिले आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गैरव्यवहार सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत कलम ८८ अन्वये सिद्ध झाला आहे. सहकार कायद्यातील कलम ७८ च्या तरतुदीनुसार एखादी व्यक्ती सहकारी संस्थेच्या अधोगतीत दोषी आढळत असेल तर त्या व्यक्तीचे इतर सहकारी संस्थांमधील संचालकपद रद्द केले जाते. त्या अनुषंगाने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह चौघांना पद रद्द करण्याबाबत प्रादेशिक सहसंचालकांकडून (साखर) नोटीस बजावण्यात आली आहे. त्या अनुषंगाने राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांना चॅलेंज केले आहे.