बंगालच्या उपसागरात तयार झालेलं चक्रीवादळ रेमल आज पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकलं. या चक्रीवादळाचा फटका पश्चिम बंगाल किनारपट्टी भागाला जाणवतोय. वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडतोय. किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग 100 ते110 किमी होता. तसंच अनेक भागात झाडं कोसळली आहेत. उत्तर दिशेने चक्रीवादळाचा प्रवास सुरू आहे. मात्र जमिनीवरील प्रवास सुरू झाल्याने कमी दाबाच्या पट्ट्याचा जोर ओसरत जाईल असं भारतीय हवामान खात्याने सांगितलंय. किनारपट्टी भागातल्या 1 लाख 10 हजार लोकांचं स्थलांतर करण्यात आलंय. पंतप्रधान मोदींनीही चक्रीवादळाच्या स्थितीचा आढावा घेतला.
रेमल चक्रीवादळ रविवारी रात्री 8.30 वाजता किनारपट्टीवर धडकण्यास सुरुवात झाली. त्यावेळी हे वादळ किनारपट्टीपासून 30 किमी दूर होते. मात्र, हळूहळू ते जवळ आले आणि पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकले. रेमल वादळामुळे लाकडाची किंवा बांबूची घरे उद्ध्वस्त झाली. वाऱ्याचा वेग इतका होता की झाडेही उन्मळून पडली. अनेक किनारी भागात विजेचे खांबही उन्मळून पडल्याचे दिसून आले. सुंदरबनमधील गोसाबा परिसरात ढिगाऱ्याखाली येऊन एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दिघा येथील किनारपट्टीवर उंच लाटा उसळताना दिसत आहेत. रेमलमुळे पश्चिम बंगालच्या संपूर्ण किनारपट्टी भागात जोरदार पाऊस झाला आहे.