तयारी विधानसभेची चाचपणी स्वबळाची…..

राज्यात गेल्या पाच वर्षांत अनेक राजकीय उलथापालथी झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक पार पडली. महायुती व महाविकास आघाडीमध्ये सरळ लढत झाली असली, तरी जागा वाटप करताना दोन्हीकडील नेत्यांची दमछाक झाली. अनेक ठिकाणी नाराजीचा फटकाही बसला. लोकसभेला ही अवस्था तर विधानसभेला इच्छुकांची संख्या आणि वाटणीला येणाऱ्या जागा पाहता, मोठ्या प्रमाणात बंडखोरी होणार आहेत.

त्यामुळे मोठ्या राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेत स्वबळ आजमावले तर काय होऊ शकते? याची चाचपणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीचा धुरळा अजून खाली बसायचा असताना राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपातील ताणाताणी पाहता, विधानसभा स्वबळावर लढावी का?अशी चर्चा मोठ्या पक्षांत सुरू आहे. मात्र, कोल्हापूरचा विचार केला तर येथे बहुतांशी पक्षांकडे दहाच्या दहा मतदारसंघांत ताकदवान उमेदवार नसल्याने त्यांची कोंडी हाेऊ शकते. मात्र, महाविकास आघाडी आणि महायुती एकसंध राहिली तर विधानसभेला प्रत्येक मतदारसंघात काट्याची टक्कर पाहायला मिळणार हे निश्चित आहे.

लोकसभेच्या निकालानंतर कोणी कोणत्या मतदारसंघात मदत केली आणि कोणी टांग मारली हे उघड होणार असल्याने त्यानंतरच स्वबळावर की एकत्रित लढायचे, याचा निर्णय होऊ शकतो.कोल्हापुरात दहा विधानसभा मतदारसंघांतील स्थिती पाहिली तर दहाच्या दहा ठिकाणी ताकदवान उमेदवार एकाही राजकीय पक्षाकडे नाही. त्यामुळे स्वबळाची चाचपणी असली तरी येथे एकमेकांचा हात धरूनच निवडणूक लढवावी लागणार आहे.