पुणे-कोल्हापूर या महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असून, कोल्हापुरातून पुण्याला जाण्यासाठी तब्बल सात तास लागत आहेत. त्यामुळे जोपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत टोल घेऊ नका, या मागणीसाठी काँग्रेसकडून येत्या शनिवारी
सकाळी १० वाजता कोल्हापूर-पुणे महामार्गावरील चारही टोलनाक्यांवरील वाहने मोफत सोडण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेस लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पुणे-कोल्हापूर महामार्गाची अवस्था प्रचंड दयनीय झाल्याने याविरोधात काॅंग्रेसने एल्गार पुकारला असून, यासंदर्भात दिशा ठरवण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून बुधवारी कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांतील काँग्रेसचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार विश्वजित कदम, पुरंदरचे आमदार संजय जगताप, जतचे आमदार विक्रम सावंत उपस्थित होते.