लोकसभा निवडणुकीत जागा वाटपावरुन महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळाले. इच्छुकांची गर्दी, बंडखोरीची तंबी, नाराजीनाट्य अन् पक्षांतर्गत कुरघोड्या संपवता संपवता सर्वच नेत्याच्या दिग्गजांची अक्षरश: दमछाक झाली.आता लोकसभेचा रणसंग्राम संपल्यानंतर पुन्हा एकदा विधान परिषद तिकीटावरुन महायुती तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर पेच उभा राहिल्याचे पाहायला मिळत आहे.लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर आता विधान परिषद निवडणुकांचे वेध लागले आहेत.
२६ जूनला महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत तर १ जुलैला निकाल लागणार आहे. विधान परिषदेच्या चार जागांसाठी महाविकास आघाडी तसेच महायुतीमधील इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे. ठाकरे गटाकडून घटक पक्षांशी चर्चा न करताच पुन्हा एकदा मुंबई शिक्षक व पदवीधरसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसमोर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. तर शिवसेना शिंदे गटाने मुंबई पदवीधर जागेवर दावा केला. मात्र भाजपही ही जागा लढण्यासाठी आग्रही असल्याने उमेदवारीचा पेच सोडवताना प्रमुख नेत्यांचा कस लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.