सोलापूर जिल्ह्यातील पवार गटाचे राजकारण बिघडण्याची चिन्हे

महाआघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माळशिरस, करमाळा, माढा, पंढरपूर, मोहोळ, शहर उत्तर या सहा जागांसाठी आग्रही आहेत. माळशिरस, करमाळ्याचे उमेदवार जवळपास निश्चित आहेत.उर्वरित तीन जागांवरील उमेदवार निवडीचे गणित चुकल्यास पवार गटाचे जिल्ह्यातील राजकारणही बिघडण्याची चिन्हे असल्याचे मत राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत.

लोकसभेत माढ्यातून खा. धैर्यशील मोहिते-पाटील निवडून आले. या निकालानंतर मोहिते-पाटील गटाने जिल्ह्यात हात-पाय पसरायला सुरुवात केली. यातून शरद पवार एकनिष्ठ पदाधिकारी आणि मोहिते-पाटील गटाचे पदाधिकारी यांच्यात सप्त संघर्ष सुरू झाला. मोहिते-पाटलांनी माळशिरसमधून उत्तम जानकर, करमाळ्यातून नारायण पाटील तर सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख यांची उमेदवारी निश्चित केली आहे.

दरम्यान, सांगोल्यातील अजितदादा गटाचे नेते दीपक साळुंखे यांनी उद्धवसेनेत प्रवेश केला. सांगोल्यातून दीपक साळुंखे उमेदवार असतील, असे संकेत खासदार संजय राऊत यांनी दिले. यामुळे पवार आणि मोहिते- पाटलांचे सांगोल्याचे गणित बिघडले आहे. सेनेचा हा डाव पवार आणि मोहिते-पाटील कसा परतवून लावतात याकडे लक्ष असेल.