आपत्ती व्यवस्थापनासाठी वाळवा तालुक्यात यंत्रणा सज्ज!

यावर्षी मान्सूनचे आगमन लवकर होणार आहे. तसेच पाऊस भरपूर होणार असल्याचे संकेत देखील दिलेले आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाळवा तालुक्यातील महापूर स्थितीचा पूर्वानुभव लक्षात घेऊन वाळवा तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी दिले. इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील नाट्यगृहात वाळवा तालुक्यातील सर्व शासकीय विभागाच्या अधिका-यांची बैठक झाली.

यावेळी तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी वाळवा तालुक्यात पूरस्थित उद्भवल्यास आपत्ती निवारणाच्या दृष्टीने आवश्यक असणा-या साधनसामग्रीचा आढावा घेतला. पूरप्रवण गावांमध्ये बोटींच्या साहाय्याने सराव घेण्याच्या सूचना दिल्या. ग्रामपंचायतीने नाले, ओढे, गटार, प्रवाहित ठेवावेत. गावातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास सुरू ठेवण्याची सूचना केली. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक औषधसाठा, लसी उपलब्ध ठेवण्याच्या सूचना दिल्या. विद्युत वितरण कंपनीने वीज व्यवस्थेचे संचालन करावयाचे आहे. आपत्ती काळात सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे आवाहन केले.