वाळवा तालुक्यात उडाली खळबळ; सेवानिवृत्त सैनिकाला साडेपंधरा लाख रुपयांचा गंडा!

आजकाल गुन्हेगारी प्रवृत्त्तीत खूपच वाढ झालेली आहे. अनेक फसवणुकीच्या घडताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणात निर्माण झालेले आहे. सी.बी.आय.अधिकारी असल्याचा बनाव करत काळ्या पैशाच्या व्यवहारात नाव आले असून तुम्हाला आम्ही तात्काळ अटक करणार आहोत, अशी फोनवरून धमकी देत वाळवा तालुक्यातील वशी येथील सेवानिवृत्त सैनिकाला साडेपंधरा लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.याबाबत वसंत विक्रम पोतदार (रा. वशी ता.वाळवा) यांनी कुरळप पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

रविकुमार, नवनीत सिन्हा (पूर्ण नावे नाहीत) यांचेवर कुरळप पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक फसवणुकीच्या प्रकाराने वाळवा तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एक ऑगस्टला सकाळी अकरा च्या सुमारास फिर्यादी पोतदार यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला. सी.बी.आय.खात्यातून आय.पी.एस. अधिकारी बोलत असून तुम्ही काळ्या पैशाच्या गैरव्यवहारात सुरेश अनुराग सोबत संशयित आहात. तुमच्याकडे काळा पैसा आहे. तुमच्या बँक खात्याची चौकशी होणार आहे.

देशाच्या सुरक्षिततेला तुम्ही धोका पोहचवत आहात. याबाबत कोणालाही काही सांगू नका;अन्यथा तुमच्या कुटुंबियांना तात्काळ अटक केली जाऊ शकते. कुटुंबियांपुर्वी तुमच्यावर अटक वॉरंट आहे. कधीही तात्काळ अटक केली जाऊ शकते असे व्हिडिओ कॉलवर सांगण्यात आले. त्यावेळी त्या अज्ञात व्यक्तीने पोलिसांचा पोशाख परिधान केला होता. पाठीमागे सी.बी.आय. मुंबई असा फलक होता. काही वेळातच त्याने फोन बंद केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता पोतदार यांच्या मोबाईलवर पुन्हा व्हाट्सएप वरून कॉल आला. मुंबई येथील सी.बी.आय. खात्यातून नवज्योत सिंह बोलत असून तुमच्या काळ्या पैशाच्या चौकशीसाठी तुमचे आधार कार्ड पाठवा असे सांगितले. पोतदार यांनी तात्काळ त्या क्रमांकावर आपले आधार कार्ड पाठवले. थोड्या वेळात व्हाट्सएपवर एक पत्र आले. त्यात पोतदार यांचे नाव अटक वॉरंटमध्ये असल्याचे दाखवत समोरील व्यक्तीने तुमच्या संपूर्ण खात्याची चौकशी करावी लागेल असे सांगून बँक डिटेल्स मागितले. त्यावेळी पोतदार यांनी सेव्हिंग खाते व एक पावती बँकेत असल्याची माहिती दिली.

त्यानंतर समोरील व्यक्तीने पोतदार यांना बँकेतून तात्काळ ते सर्व पैसे काढून आम्ही देईल त्या खात्यावर कोणालाही काहीही न सांगता ठराविक खात्यावर भरण्यास सांगितले. त्यानुसार पोतदार यांनी आपली पावती व सेव्हिंग खात्यावरील सुमारे पंधरा लाख पन्नास हजार रुपये काढून त्या अज्ञात व्यक्तीच्या खात्यावर आर.टी. जी.एस.च्या माध्यमातून पाठवले. त्यानंतर त्या व्यक्तीने चौकशी करून झाल्यानंतर तुमचे पैसे तुमच्या खात्यात चार दिवसांत जमा होतील, असे सांगितले. मात्र ते अद्याप जमा न झाल्याने पोतदार यांनी कुरळप पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. यावरून पोतदार यांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे पुढे आले आहे.