टीम इंडियासाठी वाईट बातमी! उपकर्णधार इतक्या सामन्यांमधून बाहेर

भारतीय संघ येत्या रविवारी इंग्लंडविरूद्ध दोन हात करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. लखनऊच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या अजुनही पूर्णपणे फिट झाला नसून इंग्लंड आणि श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यातून तो बाहेर पडला आहे. तो थेट ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात खेळताना दिसून येणार आहे.

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या भारत विरूद्ध बांगलादेश सामन्यादरम्यान हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त झाला होता. या दुखापतीनंतर त्याला मैदान सोडावं लागलं होतं.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानूसार तो अजुनही पूर्णपणे फिट झाला नसून त्याने गोलंदाजीचा सराव करायला सुरुवात केलेली नाही. तो राष्ट्रीय क्रिकेट अॅकेडमीत असून त्याला फिट होण्यासाठी आणखी काही दिवसांचा अवधी लागू शकतो.

तो मुंबई किंवा कोलकाता येथे होणाऱ्या सामन्यात भारतीय संघासोबत जोडला जाऊ शकतो. हार्दिक पंड्या हा संघातील प्रमुख खेळाडू आहे. भारतीय संघ सेमीफायनल खेळणार असल्याची चिन्हं दिसत असताना टीम मॅनेजमेंट हार्दिक पंड्याबाबत कुठलीही रिस्क घेऊ शकत नाही.

बांगलादेशविरूद्धच्या सामन्यातून बाहेर झाल्यानंतर हार्दिक पंड्या न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात खेळताना दिसून आला नव्हता. सुरूवातीला असं म्हटलं जात होतं की, २९ ऑक्टोबरला इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या सामन्यात हार्दिक पंड्या खेळताना दिसून येईल. मात्र स्कॅन रिपोर्ट्स आल्यानंतर ही प्रतिक्षा लांबणीवर गेली आहे.