मराठा आरक्षणासाठी मागील काही दिवसांत मराठवाड्यात होणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आत्महत्या करू नका असे अवाहन मनोज जरांगे यांच्याकडून सतत करण्यात येत आहे. मात्र, असे असतांना देखील आत्महत्या सुरूच आहे.
गेल्या दोन दिवसांत पुन्हा एकदा मराठवाड्यात दोघांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे. परभणी जिल्ह्यातील 34 वर्षीय आणि लातूरमधील 21 वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवलं आहे. सचिन शिंदे (वय 34 वर्ष, सनपुरी लातूर), प्रदीप निवृत्ती मते (वय 21 वर्ष, रा.लोणी शहाजहानपूर, ता. जि. बीड असे आत्महत्या केलेल्या तरुणांची नावं आहेत.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असतानाच कुठल्याही तरुणांनी टोकाचे पाऊल उचलून नाही, असं प्रशासन, मनोज जरांगे यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मात्र, तरीही तरुण आत्महत्याकडे वळत आहेत. परभणीच्या सनपुरी गावात 34 वर्षीय सचिन शिंदे याने मराठा आरक्षणासाठी आपले जीवन संपवले आहे.
‘मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मी स्वतःला संपवत आहे’, अशा आशयाची चिठ्ठी लिहून सचिनने शेतात गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात असून, संपूर्ण सनपुरी गावावर शोककळा पसरली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लातूर जिल्ह्यातील आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएसचे शिक्षण घेत असलेल्या प्रदीप मते या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली आहे. ‘मराठा आरक्षण’ अशी चिठ्ठी लिहून व मोबाईलवर स्टेटस ठेवत गळफास लावून या तरुणाने जीवन संपवलं. शुक्रवारी (12 डिसेंबर) रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एका खाजगी वसतिगृहात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रदीप मते एका खाजगी आयुवेर्दिक महाविद्यालयात बीएएमएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. तो सध्या खाजगी वसतिगृहात राहत होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी त्याची सुरुवातीपासूनच धारणा होती. मराठा आरक्षणासाठी त्याने शुक्रवारी राहत असलेल्या खोलीतील पंख्याला सुताच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.
मृत्यूपूर्वी मयत प्रदीप मते याने एका चिठ्ठीत ‘मराठा आरक्षण-12-1- 2024’ व मोबाईलच्या स्टेटसला ‘मराठा आरक्षण’ असे लिहून आपली जीवनयात्रा संपविली. याप्रकरणी लातूरच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.