मंजुर होऊनही सोलापुरातील या मार्गाचे काम रखडलेलेच…. अपघाताच्या प्रमाणात वाढ

मित्रांनो आजकाल रस्त्यांची खूपच दुरावस्था झालेली आहे म्हणजेच खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे हेच समजत नसल्याकारणाने अपघातांच्या प्रमाणामध्ये खूपच वाढ झालेली पाहायला मिळते.

सोलापूर जिल्ह्यातील असेच काहीसे पहायला मिळत आहे.मंजूर होऊनही केवळ टेंडर प्रक्रियेत व शासकीय संथगती च्या कारभारामुळे पापरी- पेनुर रस्त्याचे काम रखडले आहे. रस्त्यावर मोठ मोठे खड्डे व उचकटलेली खडी यामुळे नागरिक वैतागले आहेत. त्वरित रस्त्याचे काम सुरू करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

पापरी-पेनुर या सुमारे सहा किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी आमदार यशवंत माने यांनी चार कोटी रुपये मंजूर केले आहेत. या रस्त्यावरून पापरी, खंडाळी आदीसह अन्य गावांचे नागरिक ये जा करतात. मोहोळ ते आळंदी पालखी मार्गाला जोडणारा सर्वात जवळचा हा रस्ता आहे.

याचा सर्वात जास्त फटका ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला बसतो. फडात किती जरी ऊस आवळून बांधला तरीही खराब रस्त्यामुळे हेलकावे खाऊन ट्रॉली मधुन ऊसाच्या मोळया पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच हादरे बसून अनेकांना मणक्याचा त्रास सुरू झाला असून, छोट्या मोठ्या अपघाताचे प्रमाण ही वाढले आहे. पेनुर येथील बँक ऑफ महाराष्ट्र च्या कार्यक्षेत्रात अनेक गावे असल्याने बँकेतील कामासाठी वृद्ध, महिला यांना जाणे अडचणीचे झाले आहे.

दूध भाजीपाला वाहतूक करणाऱ्या बरोबरच शाळकरी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांना ही खराब रस्त्यावरील त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

याच रस्त्यावरून लोकनेते, भीमा, जकराया व आष्टी शुगर या साखर कारखान्याची ऊस वाहतूक होते. यापूर्वी अनेक विविध सामाजिक संघटना व्यक्तींनी रस्ता दुरुस्तीसाठी निवेदने दिली आहेत. मात्र अद्यापही याची दखल घेतलेली दिसत नाही.

पापरी- पेनुर रस्त्याचे काम सुरू होण्यासाठी आणखी किमान दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. बरीच प्रशासकीय प्रक्रिया बाकी आहे.टेंडर लाईव्ह झाले असले तरी, इतर कायदेशीर प्रक्रिया आहेतच. लवकरात लवकर काम सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. असे अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागकडून सांगण्यात आले आहे.