……अन्यथा सिलेंडरवर मिळणारे अनुदान (सबसिडी) बंद

केंद्रातील भारतीय पेट्रोलियम मंत्रालयाने उज्ज्वला योजनेसह घरगुती एलपीजी गॅस जोडणीच्या ग्राहकांना ‘ई- केवायसी’ अनिवार्य केली आहे. त्यानुसार ग्राहकांना जोडणी असलेल्या गॅस एजेंसीत जाऊन बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
प्रक्रिया न केल्यास ग्राहकाची प्रति सिलेंडरवर मिळणारे अनुदान (सबसिडी) बंद होणार आहे. सध्या गॅस धारकाला संबंधित गॅस एजेंसीकडून तसे मोबाईलवर संदेश येत आहे. ग्राहकाला (गॅस जोडणी ज्याच्या नावाने असेल) ‘ई- केवायसी’ करण्यासाठी त्याच्या एलपीजी गॅस एजेंसीच्या कार्यालयात यावे लागेल. येथे येतांना लाभार्थ्यांचा मोबाइल व आधारकार्ड सोबत असणे आवश्यक आहे. सदर कार्यालयात ग्राहकाचा बायोमेट्रिक अंगठा घेऊन एक प्रक्रिया एजेंसीकडून केली जाईल.

त्यानंतर ग्राहकाला परत जाता येईल. दरम्यान ही ई-केवायसी प्रक्रिया न केल्यास ग्राहकाचे गॅस सिलिंडर वितरण व अनुदानही बंद होऊ शकते.एखाद्या ई- केवायसी न केलेल्या ग्राहकासोबत असे झाल्यास तो संबंधित एजन्सीमध्ये जाऊन ही प्रक्रिया नंतरही करू शकतो. या गॅस कंपनीकडून संबंधित ग्राहकाची गॅश जोडणी पून्हा सुरू होईल. ग्राहकांनी त्यांच्या गॅस जोडणीची सुरक्षा तपासणीही करून घेणे अनिवार्य आहे. दरम्यान ई- केवायसीमुळे तुमचा मोबाइल क्रमांक बदलला आहे. तो तत्काळ अपडेट होईल, जोडणी धारकाचा मृत्यू झाला असल्यास संबंधित जोडणी दुसऱ्याच्या नावावर करता येईल.

गॅस जोडणीमध्ये इतर काही अडचणी असल्यास त्या दुरुस्त करता येतील. ग्राहक सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ घेऊ इच्छितात तर त्यांनी जोडणीमध्ये नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरूनच सिलिंडर रिफिलिंग बुकिंग करावी. बुकिंग केल्याशिवाय वितरण करणाऱ्या व्यक्तींकडून सिलिंडर घेऊ नये. त्यामुळे लाभाथ्याँच्या सबसिडीचे नुकसान होऊ शकते असे येथील पुरवठा विभागाकडून सूचित करण्यात आले.