इंदापूर तालुक्याला पिण्यासाठी व जनावरांच्या पाण्यासाठी खडकवासला कालव्यातून तातडीने अर्धा टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा विभागाला दिले आहेत. अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांनी दिली.कालवा संघर्ष समिती व शिष्टमंडळाने पुणे येथे उपमुख्यमंत्री पवार यांची शनिवारी (दि. १) भेट घेऊन इंदापूर तालुक्याला पाणी सोडण्याची मागणी केली असता पवार यांनी सांगितले. आमदार दत्तात्रय भरणे यांच्या समवेत सविस्तर चर्चा झाली असून तत्काळ पाणी सोडण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.
तालुक्याला तातडीने आवर्तन मिळावे या मागणीसाठी कालवा संघर्ष समितीच्या माध्यमातून डाळज क्र. २ येथे पुणे-सोलापूर महामार्गावर रास्तारोको आंदोलनही करण्यात आले.उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या सहकार्याने अर्धा टीएमसी पाणी तत्काळ तालुक्याला सोडले जाणार आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. शेतकरी कृती समितीच्या आंदोलनाला यश आले आहे.- विजय गावडे, शेतकरी कृती समिती
दौंड तालुक्याला पाणी सोडण्यात आले मात्र इंदापूर तालुक्याला पाणी नसल्याने रोष व्यक्त करण्यात आला होता. याबाबत जलसंपदा विभागाने दौंडला सोडण्यात आलेले पाणी हे कालवा सल्लागार समितीच्या पूर्वनियोजन पाणी वाटपाच्या निर्णयानुसार सुरू आहे.
इंदापूरला मंजुरीशिवाय पाणी देता येणार नाही. मात्र पाणी देण्याबाबत सकारात्मक असल्याचे कार्यकारी अभियंता कुन्हाडे यांनी सांगितले होते. त्यामुळे कळस येथील कालवा संघर्ष समिती व शिष्टमंडळाने पुणे येथे उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली असता इंदापूर तालुक्याला तातडीने अर्धा टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश पवार यांनी दिले. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील अवर्षणप्रवण ३६ गावांना दिलासा मिळणार आहे.