चिन्हांवरून इस्लामपूर मतदारसंघात मतदारांत संभ्रम; विधानसभेला दुरंगी लढतीमुळे राजकीय समीकरणे बदलली… 

इस्लामपूर मतदारसंघात सलग आठव्यावेळी लढणाऱ्या विद्यमान आ. जयंत पाटील यांची उमेदवारी नेहमीप्रमाणेच निश्चित होती. परंतु, विरोधकांपुढे सक्षम उमेदवार नव्हता. याची शोधाशोध महायुतीकडून सुरू होती. मागील निवडणुकीत हा मतदारसंघ उद्धवसेनेकडे होता. यावेळी हा मतदारसंघ शिंदेसेनेकडे जाईल, अशी चर्चा असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आ. जयंत पाटील यांना शह देण्याच्या इराद्याने आपल्याकडे खेचून घेतला.

महायुतीत या सर्व घडामोडी घडत असतानाच मातब्बर उमेदवारांचीही चाचपणी सुरू होती. वरिष्ठ पातळीवर फडणवीस आणि पवार यांच्यामध्ये सेटिंग-गेटिंग धोरणानुसार भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना अजित पवार गटाची उमेदवारी देत मैदानात उतरवण्याचा घाट घातला गेला. त्यामळे एकतर्फी वाटणारी ही निवडणूक चुरशीच्या टप्प्यापर्यंत रंगत गेली. 

मागील निवडणुकीत सातव्यावेळी विजय नोंदवणाऱ्या आ. जयंत पाटील यांना तिरंगी लढतीमध्ये ७२ हजारहून अधिक मताधिक्य मिळाले होते. एकूण मतदान ७३.७३ टक्के इतके झाले होते.एकास एक लढतीमुळे इस्लामपूर विधानसभेच्या रणांगणावर यावेळची निवडणूक आरोप- प्रत्यारोपांची धुळवडच साजरी करणारी ठरली. नेहमी तिरंगी लढत होत असलेल्या मतदारसंघात यावेळची निवडणूक मात्र दुरंगी झाल्याने राजकीय समीकरणे बदलली. राष्ट्रवादीत फूट पडल्याने चिन्हांचाही प्रश्न चांगलाच गाजला. निकालानंतर मतदारसंघात वेगळे चित्र दिसण्याचे संकेत मिळत आहेत.