इस्लामपूर मतदारसंघात वाढलेल्या टक्क्याचा कोणाला होणार फायदा?

विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या, शनिवारी २३ तारखेला जाहीर होणार आहे. एकास एक लढतीमुळे इस्लामपूर विधानसभेच्या रणांगणावर यावेळची निवडणूक आरोप- प्रत्यारोपांची धुळवडच साजरी करणारी ठरली. नेहमी तिरंगी लढत होत असलेल्या मतदारसंघात यावेळची निवडणूक मात्र दुरंगी झाल्याने राजकीय समीकरणे बदलली. मागील निवडणुकीत सातव्यावेळी विजय नोंदवणाऱ्या आ. जयंत पाटील यांना तिरंगी लढतीमध्ये ७२ हजारहून अधिक मताधिक्य मिळाले होते. एकूण मतदान ७३.७३ टक्के इतके झाले होते.

राष्ट्रवादीत फूट पडल्याने चिन्हांचाही प्रश्न चांगलाच गाजला. निकालानंतर मतदारसंघात वेगळे चित्र दिसण्याचे संकेत मिळत आहेत. यावेळी केवळ १ टक्का मतदानाची वाढ होऊन ते ७४.७१ टक्क्यांवर स्थिरावले आहे. दुरंगी लढत असल्यामुळे दोन्ही बाजूकडून विजयाचा दावा केला जात आहे. गेल्या निवडणुकीत ७२ हजारहून अधिक मताधिक्य मिळविणाऱ्या आमदार जयंत पाटील यांना फायदा होणार की, प्रचारादरम्यान घराघरात पोहोचलेल्या निशिकांत पाटील यांच्या पारड्यात पडणार याची उत्सुकता आहे.