मराठा समाज एखाद्या नेत्याच्या माथ्यावर विजयाचा गुलाल लावू शकतो तसाच वेळ पडल्यावर तो गुलाल पुसूही शकतो, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सर्वपक्षीय नेत्यांना इशारा दिला. आमच्यासाठी आमच्या लेकरांचं हित महत्त्वाचे आहे. आम्ही मोठे केलेले नेते जर आता आमच्याविरोधात जात असतील तर आम्हाला त्यांना पायाखाली तुडवावे लागेल, असेही त्यांनी म्हटले. ते शनिवारी नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी दिलेल्या २४ डिसेंबरच्या अल्टिमेटमचा पुनरुच्चार केला. तोपर्यंत मराठा आरक्षण मिळालं नाही तर मग मराठा समाज काय आहे, हे लक्षात येईल. हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणासंदर्भात नेते काय भूमिका मांडत आहेत, यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. २४ डिसेंबरनंतर मराठा समाज काय आहे, हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
राज्यातील मराठा समाज एखाद्या नेत्याला गुलाल लावू शकतो तसाच वेळ आल्यावर त्याच्या अंगावर गुलाल पडणार नाही, याचीही काळजी घेऊ शकतो. आरक्षण मिळवण्याची ताकद ही पांढरे कपडे घालणाऱ्या मराठ्यांमध्ये नाही. आरक्षण मिळवण्याची ताकद सर्वसामान्य मराठ्यांमध्ये आहे, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले. यावेळी मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले. देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सभागृहात अंतरवाली सराटी येथे मराठा मोर्चावर झालेल्या पोलीस लाठीमारासंदर्भात एक लेखी उत्तर दिले होते. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अंतरवाली सराटीत आंदोलकांपेक्षा जखमी पोलिसांची संख्या जास्त असल्याचे म्हटले होते. याविषयी मनोज जरांगे यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस आपलं हे वक्तव्य बदलतील. ते लवकरच त्यांच्या मूळ भूमिकेवर येतील, ही खात्री आहे. एकट्याच्या (छगन भुजबळ) दबावाखाली येऊन त्यांनी स्टेटमेंट बदललं तर त्यांना परिणामांना सामोरे जावे लागेल. देवेंद्र फडणवीस खरं बोलले नाही तर मराठे त्यांना पुन्हा उघडं पाडतील. त्यांनी कोणाच्या दबावाखाली येता कामा नये. त्यांच्यासाठी मराठा समाजही गरजेचा आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
काही सरकारी अधिकाऱ्यांकडून मराठा समाजातील लोकांच्या कुणबी नोंदी शोधण्यात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. नांदेडच्या कंधारमध्ये नुकतेच असे एक प्रकरण समोर आले होते. कंधारमध्ये कुणबी नोंदी असूनही सरकारी अधिकाऱ्यांनी संबंधित मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले नाही. कुणबी नोंदी नसल्याचे सांगत निरंक अहवाल देण्यात आला. त्यामुळे सरकारी अधिकारीही मराठाविरोधी वागत आहेत का, अशी शंका आम्हाला येऊ लागली आहे. मोडी लिपीच्या अभ्यासकांनी याठिकाणी २७ कुणबी नोंदी शोधल्या होत्या. तरीही शासकीय अधिकाऱ्यांनी निरंक अहवाल दिला. त्यामुळे नोंदणी अधिकारी जातीयवाद करत आहेत का? हा प्रश्न आहे. ही बाब मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कानावर घालणार आहे. शिंदे समितीनेही सराकारी अधिकाऱ्यांकडून अपेक्षित काम होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अशा सरकारी अधिकाऱ्यांना कामावरुन कमी केले पाहिजे, निलंबित केले पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.
मराठवाड्यात कुणबी नोंदी सापडण्याचे प्रमाण कमी आहे, याविषयी जरांगे पाटलांना विचारले असता त्यांनी सांगितले की, मराठवाड्यात मोडी लिपीचे अभ्यासक कमी असल्यामुळे कुणबी नोंदी सापडण्याचे प्रमाण कमी आहे. काही अधिकारी जातीयवाद करत आहेत. नांदेड, लातूर येथील अधिकारी कुणबी नोंदी शोधण्यात चालढकल करत आहेत. मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी अभ्यासकांची गरज आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.