इस्लामपूर मतदारसंघात बदलत्या राजकीय पोस्टरचे वॉर

तुंग (ता. मिरज) येथील मारुती मंदिर जागृत देवस्थान आहे. येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. सांगली, इस्लामपूर, तासगाव, आष्टा यासह नजीकच्या जिल्ह्यातूनही हजारो भाविक येथे मारुतीच्या दर्शनासाठी येतात. तुंग मिरज तालुक्यात असले तरी इस्लामपूर मतदारसंघात येते. याठिकाणी जयंत पाटील समर्थकांची सत्ता आहे. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर जयंत पाटील विरोधी लोकनियुक्त नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचे पोस्टर झळकले होते. विधानसभेनंतर जयंत पाटील आणि प्रतीक पाटील यांची पोस्टर्स या जागी आली. आता नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांची पोस्टर्स दिसू लागली आहेत. त्यामुळेच तुंग गावचे राजकारण आगळे-वेगळे असल्याचे चित्र दिसते.

परिसरात डिजिटल पोस्टर्सची रेलचेल असते. राजकीय समीकरणे बदलानुसार येथील पोस्टर्स देखील बदलतात. आमदार जयंत पाटील आणि प्रतीक पाटील यांच्या ठिकाणी आता खासदार विशाल पाटील यांची पोस्टर्स झळकू लागली आहेत. दिवंगत माजी मंत्री आर. आर. पाटील यांनी राबवलेल्या संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात तुंग (ता. मिरज) गावाने बाजी मारली. त्यानंतर येथील राजकीय नेत्यांमध्ये वेगवेगळे गट निर्माण झाले. त्यामुळेच आजही मारुती मंदिराचा जीर्णोद्धार आणि परिसरातील विकास संथ गतीने सुरू आहे. त्यामुळेच परिसरात कार्यकर्ते आपापल्या ताकदीने आपल्या नेत्यांची राजकीय डिजिटल पोस्टर्स झळकावली जातात. परिणामी परिसरातील भक्तिमय वातावरण बिघडत चालले आहे. प्रत्येक वेळी सत्ताबदल झाल्यानंतर नेत्यांची पोस्टर्स देखील बदलली जातात. याचीच चर्चा भाविकांतून आहे.