नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. आता हे सरकार कामाला लागले असून आगामी काही दिवसांत वेगवेगळे महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आता आठव्या वेतन आयोगाची चर्चा चालू झाली आहे. आठवा वेतन आयोग जानेवारी 2026 मध्ये लागू होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार दर दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू करते.
याआधी जानेवारी 2016 मध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला होता. आता सरकारकडून आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चा चालू आहे. केंद्र सरकारचे एक कोटी शासकीय कर्मचारी तसेच पेन्शनधारक आठवा वेतन आयोग कधी लागू होतो, याची वाट पाहात आहेत. या आयोगाकडून शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची शिफारस केली जाणार आहे. या आयोगाच्या शिफारशी 2026 मध्ये लागू होणार आहेत. भारतात याआधी सर्वांत पहिला वेतन आयोग जानेवारी 1946 मध्ये लागू झाला होता.
आठव्या वेतन आयोगाची स्थापना तसेच त्याची कार्यपद्धती याविषयी केंद्र सरकारने आतापर्यंत कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही. अद्याप आम्ही आठव्या वेतन आयोगाच्या धोरणाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारने स्पष्ट केले होते. आता लोकसभेची निवडणूक संपली आहे. त्यामुळे आता लवकरच सरकार आठव्या वेतन आयोगाची स्थापना करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.