विधानसभेसाठी सावध हालचाली सुरू…..

लोकसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर आज जिल्ह्यात विधानसभेसाठी खडाखडी सुरू झाली आहे. त्यातून महायुती आणि महाविकासमधील जागा वाटपांचे सूत्र ठरण्यापूर्वीच काहींनी रणशिंग फुंकले आहे, तर काहींनी मतदारसंघाचा कानोसा घेत सावध हालचाली सुरू केल्या आहेत. हातकणंगले विधानसभेत काँग्रेसचे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे, ठाकरे गटाचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार राजीव आवळे इच्छुक आहेत.

आघाडीत विद्यमान म्हणून राजूबाबा रिंगणात राहिले तर लोकसभेला खांद्याला खांदा लावून राबलेले डॉ. मिणचेकर, राजीव आवळे काय करणार ? हा प्रश्‍न आहे. इचलकरंजीत आघाडीकडून ढिगभर इच्छुक आहेत. पण महायुतीत पुन्हा प्रकाश आवाडे की, भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यावर लढतीचे चित्र अवलंबून आहे. शाहूवाडी विधानसभेत पुन्हा एकदा डॉ. विनय कोरे व सत्यजित पाटील-सरूडकर या पारंपरिक विरोधकांतच सामना असेल.

त्यात श्री. सरूडकर यांना सहानुभूती मिळणार की, महायुतीच्या जोरावर डॉ. कोरे बाजी मारणार याची उत्सुकता असेल. शिरोळच्या मैदानात पुन्हा एकदा उतरून माजी खासदार राजू शेट्टी आपली ताकद दाखवण्याची शक्यता आहे.त्यांच्यासमोर आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, ठाकरे गटाचे माजी आमदार उल्हास पाटील व ‘दत्त-शिरोळ’ चे गणपतराव पाटील यांचे आव्हान असेल.

स्वतः श्री. शेट्टी रिंगणात उतरणार की, विश्‍वासू सहकाऱ्यांना उतरवून संघटनेची ताकद दाखवणार हे निश्‍चित नाही; पण या मतदारसंघात ताकद लावली तर महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण लोकसभेला निर्माण झाले आहे, त्या जोरावर विजय दृष्टिक्षेपात येऊ शकतो. पण उमेदवार कोण ? यावरच ही लढत ठरेल.