शक्तीपीठ महामार्गाविरोधात आक्रोश सुरु असताना राज्य सरकारकडून….

कोल्हापूर जिल्ह्यातून दक्षिण बाजूने नागपूर-रत्नागिरी महामार्गाची (Nagpur Ratnagiri National Highway) काम प्रगतीपथावर असतानाच तसेच शेतकऱ्यांचा मोबदल्यासाठी आणि पाणंद रस्त्यांसाठी वाद सुरु आहे.हे सुरु असतानाच आता जिल्ह्याच्या उत्तर बाजूने सुद्धा नागपूरमधील पवनार ते गोव्यातील पत्रादेवी शक्तीपीठ महामार्ग (Shaktipeeth Expressway) जात असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे.

या महामार्गामध्ये जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 59 गावांमध्ये शेकडो एकर जमिनी प्रभावित होणार असल्याने हा महामार्ग रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातून एकमुखाने होत आहे.मात्र, हा विरोध डावलून राज्य सरकारकडून शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने एक प्रकारे शेतकऱ्यांच्या विरोधालाच केराची टोपली दाखवली असल्याचे स्पष्ट झालं आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यांत जमिनी घेतल्या जाणार आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील फक्त शेतकरी आणि शेतकरी संघटनांनीच शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला नसून कोल्हापूर जिल्ह्यातील सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून सुद्धा शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही महामार्ग रद्द करावा अशी मागणी केली आहे. दुसरीकडे, भाजप नेते समरसिंह घाटगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी सुद्धा शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला आहे.

मात्र, हा सर्व विरोध डावलून महामार्ग निर्मितीसाठी भूसंपादन करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे हा विरोध आता पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे.दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 59 गावे शक्तीपीठ महामार्गाच्या कामामध्ये बाधित होणार आहेत. यामध्ये सर्वाधिक भूदरगड तालुक्यातील 21 गावांचा समावेश आहे. त्या खालोखाल कागल तालुक्यातील 13 गावांचा समावेश आहे. करवीर तालुक्यातील 10 गावांचा समावेश आहे. शिरोळ, आजरा, हातकणंगले तालुक्यामधील पाच गावांचा समावेश आहे.