IMD Update: संपूर्ण राज्यात आज यलो अलर्ट……

महाराष्ट्रात वेळाआधी दाखल झालेला मान्सून विदर्भात प्रवेश करण्यापूर्वी रेंगाळला होता. परंतु आजपासून पुन्हा मान्सून सक्रीय झाला आहे. विदर्भ अन् मराठवाड्यातील काही भागांत पावसाला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे मुंबई हवामान विभागाने संपूर्ण राज्यात आज यलो अलर्ट दिला आहे.

राज्यात सर्वत्र मान्सून पोहचला आहे. मुंबई, पुणे शहरात सोमवारी सकाळापासून पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे पेरणी झालेल्या हळद, कपाशी या पिकांना चांगला आधार मिळाला आहे.

पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आंनदाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाशिम जिल्ह्यातील पाणी प्रकल्पात पाणी साठवण्यासाठी आणखी दमदार पावसाची गरज आहे. परभणी शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडला. रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. जोरदार पावसाने शेती कामांना वेग येणार आहे. नांदेडमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. परंतु पेरणीसाठी शेतकऱ्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु आता पाऊस सक्रीय होऊ लागला आहे. 20 जूननंतर राज्यात मान्सूनचा जोर वाढणार आहे. 19 ते 20 जूननंतर मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.