कुवेतच्या दक्षिण मंगफ परिसरातील इमारतीला लागलेल्या भीषण आगीत काही दिवसांपूर्वी 45 भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आता कुवेतमधून 45 भारतीय नागरिकांचे मृतदेह घेऊन हवाई दलाचं विमान मायदेशात परतलं आहे. या दुर्घटनेत मुंबईतील मालाड येथे राहणाऱ्या डेनी बेबी करुणाकरण यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला.भारतीय हवाई दलाच्या C-130J या विशेष विमानाने मृतदेहांना कुवेतहून भारतात आणलं गेलं.
कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर या विमानाचं आगमन झालं. मृतांच्या यादीत केरळमधील 23, तामिळनाडूतील 7, आंध्र प्रदेशातील 3 जणांचा समावेश आहे. या 30 जणांचे मृतदेह कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर संबंधित राज्य शासनाकडे सुपुर्द करण्यात आले. उर्वरित मृतदेहांना नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या C-130J या विशेष विमानाने आणलं गेलं.बुधवारी पहाटे साडेचार वाजता ही आग लेबर कॅम्पच्या स्वयंपाकघरातून इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे लागली.
भीषण आग लागल्यानंतर काही लोकांनी अपार्टमेंटमधून उड्या मारल्या, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, तर काहीजण आगीत होरपळून आणि धुरामुळे गुदमरून मृत्युमुखी पडले. कुवेतमधील भारतीय दूतावासाने ही माहिती दिली. या दुर्घटनेत मृत झालेल्यांमध्ये महाराष्ट्रातील एका कामगाराचा समावेश आहे.
मुंबईच्या मालाड (पश्चिम), मालवणी येथील 33 वर्षीय डेनी बेबी जे मागील चार वर्षांपासून कुवेतमधील एका खाजगी कंपनीत अकाऊंटंट आणि सेल्स समन्वयक म्हणून काम करत होते, ते मृत्युमुखी पडले.मृतांच्या यादीत केरळमधील 23, तामिळनाडूतील 7, आंध्र प्रदेशातील 3, उत्तर प्रदेशातील 3, ओडिशातील 2 आणि बिहार, पंजाब, कर्नाटक, पश्चिम बंगाल, झारखंड, हरियाणा यासारख्या उर्वरित सात राज्यांमधून प्रत्येकी एक अशा एकूण 45 जणांचा समावेश आहे.