Pushpa 2 The Rule ची रिलीज डेट पोस्टपोन, नवीन तारीख काय? 

यंदाच्या वर्षातील बहुप्रतिक्षीत चित्रपटांपैकी एक असलेला ‘पुष्पा 2 : द रुल’ची (Pushpa 2 The Rule) मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अल्लू अर्जुनचा हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, आता चित्रपटाची रिलीज डेट पोस्टपोन करण्यात आली आहे. चित्रपट निर्मात्यांनी नवी रिलीज डेटही जाहीर केली आहे. ‘पुष्पा 2: द रुल’ हा चित्रपट आता या वर्षाच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुष्पा-2 हा चित्रपट आता 6 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर रिलीज डेटची माहिती दिली आहे. त्याशिवाय, रिलीज पोस्टपोन करण्याचे कारणही सांगितले आहे.

 पुष्पाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर रिलीज डेटची घोषणा करताना म्हटले की, आम्ही तुम्हाला सर्वोत्कृष्ट कलाकृती देणार. चांगल्या मनोरंजनासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करा. ‘पुष्पा 2: द रुल’ आता 6 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘पु्ष्पा 2’ हा बहुप्रतिक्षीत चित्रपट आहे. पुष्पाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. पहिल्या भागातील गाणी, हूकस्टेप्स लोकप्रिय झालेल्या. त्यानंतर आता त्याचा सिक्वेल पुष्पा 2 रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या टीझरने, गाण्यांना कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत. 

‘पुष्पा-पुष्पा’ या गाण्याच्या लिरिकल व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. अल्लू अर्जुनच्या स्टेप्सने चाहत्यांची मने जिंकली आहे. या गाण्यातील अल्लू  अर्जुनच्या दमदार हुक स्टेपने ‘पुष्पाः द राइज’च्या पदार्पणापासूनच पॉप कल्चरचा एक भाग बनलेल्या ‘पुष्पाइझम’ची क्रेझ वाढवली आहे.  ‘पुष्पा 2’ या गाण्याला युट्यूबवर 100 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आणि 2.26 मिलियनपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. सहा भाषांमध्ये हे गाणे रिलीज झाले आहे.