Shiv Sena MLA Disqualification Case : गुवाहाटीच्या विमानांचे तिकीट ते हॉटेलचा खर्च कोणी केला? ठाकरेंच्या वकिलांचे योगेश कदमांना उलट तपासणीत अवघड प्रश्न

Shiv Sena MLA Disqualification Case :   शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी (Shiv Sena MLA Disqualification Case) विधिमंडळात सुरू आहे. शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे (Dilip Lande) यांची उलट तपासणी साक्ष नोंदवल्यानंतर आता आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांची साक्ष नोंदवण्यात येत आहे. ठाकरे गटाचे वकील अॅड. देवदत्त कामत (Adv. Devdutt Kamat) यांच्याकडून कदम यांना प्रश्न विचारले जात आहेत. सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांचा व्हीप मिळाला नसल्याची साक्ष आमदार कदम यांनी दिली खरी, मात्र ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) कदम यांना व्हीप मिळाल्याची पोचपावती सादर केली. 

आमदार योगेश कदम यांच्या सुनावणीतील प्रश्नोत्तरे : 

अॅड. देवदत्त कामत :  तुम्ही साक्ष नोंदवण्याआधी ता वाचली आहे का? 

योगेश कदम : होय

कामत : तुम्ही साक्ष नोंदवताना संपूर्ण प्रतिज्ञापत्र पाहिले आहे का? 

कदम : होय मी एकदा पाहिले आहे

कामत : आर 18 मध्ये झालेली चूक तुमच्या कधी ध्यानात आली

कदम –  काल रात्री माझ्या ध्यानात आली. 

कामत – ही चूक तुमच्या लक्षात काल रात्री कशी आली

कदम – मी काल रात्री एकदा ही प्रत वाचली. तेव्हा माझ्या ध्यानात आले की ही चुकीची प्रत जोडली गेली आहे.

कामत – तुम्ही कालपर्यंत या गोष्टीपासून अनभिज्ञ होता, हे म्हणणे खरे आहे का? 

कदम – होय

कामत – तुम्ही 25 ऑक्टोबर 2023 रोजी दाखल केलेल्या अतिरिक्त प्रतिज्ञापत्र आर 18 मध्ये चूक झाल्याचे तुम्हाला माहिती नव्हते. हे खरे आहे का? 

कदम – मला काल लक्षात आले की आर 18 ही चुकीची प्रत जोडली गेली आहे. 

कामत – 25 ऑक्टोबर 2023 रोजी तुम्हाला हा चूक लक्षात आली नाही. 

कदम – नाही, माझ्या लक्षात नाही आले. 

कामत – तुमच्या वकिलांनी तुम्हाला हे वाक्य आज बोलण्यास सांगितले आहे. 

कदम – हे खरे नाही.

कामत – तुम्ही शिवसेना राजकीय पक्षाचे सदस्य कधीपासून आहात? 

कदम – जन्मापासून माझा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीवर विश्वास आहे. मी 18 वर्षांचा झालो, तेव्हापासून मी शिवसेना राजकीय पक्षाचा सदस्य आहे. मला वाटतं, 2004 सालापासून मी सदस्य आहे.

कामत – 2004 साली तुम्ही शिवसेनेचे सदस्य झाला, तेव्हा बाळासाहेब हे पक्षाचे प्रमुख होते.? 

कदम – होय

कामत – शिवसेनेच्या तिकीटावर तुम्ही निवडणूक कधी लढला? 

कदम – 2019 सालची विधानसभा निवडणूक

कामत – 2019 साली राष्ट्रीय कार्यकारिणी कोणती होती? 

कदम – मला सर्वजण आठवत नाहीत. 

कामत – तुम्हाला किती आठवत आहेत? 

कदम – 3 ते 4

कामत – त्यांची नावे सांगा. 

कदम : रामदास कदम, गजानन कीर्तीकर, एकनाथ शिंदे

शिंदे गटातील ज्युनियर वकिलांकडे पाहून देवदत्त कामत संतापले

कामत : तुम्ही साक्षीदारांना खुनावू नका

शिंदे गटाचे वकिल भडकले. तो ज्युनियर वकिल आहे. तो काय खानाखूना करणार?


कामत – या पानावरील 9 नावे पाहा. पहिल्या क्रमांकावर आदित्य ठाकरे तर नवव्या क्रमांकावर गजानन कीर्तिकर यांची नावे आहेत. ही 9 सदस्य राष्ट्रीय कार्यकारिणीत आहेत का? 

कदम – होय. 

कामत – जानेवारी 2018 ते जून 2022 पर्यंत प्रतिनिधी सभेचे सदस्य कोण होते? 

कदम – ते रेकॉर्ड वर आहे.

कामत – तुमच्या प्रतिज्ञापत्रात तुम्ही शिवसेना विधीमंडळ सदस्य असल्याचा दावा केला आहे. याचा अर्थ तुम्ही 2004 सालापासून शिवसेना विधीमंडळ पक्षाचे सदस्य आहात, असे तुम्हाला म्हणायचे आहे का? 

कदम – मी 2004 सालापासून शिवसेना विधीमंडळ पक्षाचा सदस्य नव्हतो.

कामत – शिवसेना विधीमंडळ पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंद आहे का? 

कदम – रेकॉर्डवर आहे

कामत – शिवसेना विधीमंडळ पक्षाचे काही नियम आहेत का? 

कदम – रेकॉर्ड वर आहे

कामत – तुम्ही ते रेकॉर्ड सादर करू शकता का? 

कदम – होय

कामत – तुम्ही 21 जून 2021 रोजी कुठे होता? 

कदम – मी मुंबईत होतो.

कामत – तुम्ही म्हटले की शिवसेनेचे नियम हे रेकॉर्डवर आहे. तुम्ही असे रेकॉर्ड सादर केलेले नाही, तुम्ही खोटे बोलत आहात. 

कदम – हे खरे नाही.

कामत – साक्षीदारास त्यांच्या प्रतिज्ञापत्रातील परिच्छेद-3 दाखवावा. तुम्ही या परिच्छेदात नमूद केलेली कथित बैठक कुठे झाली? 

कदम – माझा विश्वास आहे की सुरत मध्ये झाली.

कामत – तुम्ही 21 जूनला मुंबईत होता, म्हणजे त्या कथित बैठकीत तुम्ही अनुपस्थितीत होता. हे खरे आहे का? 

कदम – मी जातीने हजर नव्हतो. पण मला भरत गोगावले यांनी कॉल करून या बाबत माहिती दिली. 

कामत – शिवसेना विधीमंडळ पक्षाची बैठक वर्षा बंगल्यावर 21 जून 2022 रोजी झाली. हे खरे आहे का? 

कदम – हे खरे नाही. अशी कोणतीही बैठक झाली नाही

कामत – तुम्ही वर्षा बंगल्यावरील बैठकीला होतात

कदम – हे खोटे आहे, अशी कोणती बैठक झाली नाही. 

कामत – वर्षावरील बैठकीचा व्हिप तुम्हाला सुनील प्रभूंकडून मिळला होता.

कदम – नाही. 

कामत – तुम्ही 21 जून 2022 रोजीच्या वर्षा बंगल्यावरील बैठकीच्या व्हिपच्या  पोचपावतीवरती स्वाक्षरी केली होती का

कदम – मी सही केलेली नाही.

देवदत्त कामत यांनी योगेश कदम यांनी स्वाक्षरी केलेल्या पोचपावतीची मूळ प्रत अध्यक्षांसमोर सादर केली. 


कामत – या तुमच्या सह्या आहेत का? 

कदम – या माझ्या स्वाक्षरी सारख्या दिसत आहेत, पण ही सही केल्याचे मला आठवत नाही. 

कामत – तुम्ही या हजेरी पत्रकावरील 21 जून 2022 रोजी स्वाक्षरी केली होती, हे खरे आहे का? 

कदम – हे खरे नाही. 

कामत – साक्षीदार यांना याचिकेतील काही कागदपत्रे दाखवावीत. या याचिकेतील 23 व्या क्रमांकाचे याचिकाकर्ते तुम्ही आहात का? 

कदम – रेकॉर्डवर आहे. 

कामत – एकनाथ शिंदे यांच्या मार्फत दाखल करण्यात आलेले उत्तर साक्षीदार योगेश कदम यांना दाखवण्यात यावे.  हे समान उत्तर तुमच्यासह एकनाथ शिंदे यांनी दिले आहे, हे खरे आहे का?

कदम – हे रेकॉर्डवर आहे.

कामत – साक्षीदारास पान क्रमांक 503 वरील परिच्छेद 40 दाखवावा.  सुनील प्रभू यांनी 2 जुलै 2022 रोजी पाठवलेल्या व्हीपला  एकनाथ शिंदे यांनी दिलेले उत्तर तुमच्या मते खरे आहे का? 

कामत यांच्या या प्रश्नावर शिंदे गटाचे वकिलांनी आक्षेप घेतला आहे. 

कामत – तुम्ही भाजपच्या राहुल नार्वेकर यांना 3 जुलै 2022 रोजी झालेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मतदान केले, हे खरे आहे का? 

कदम – माझ्या सदसद्विवेकबुद्धीने मी मतदान केले. 

कामत – 2022 मधील अपात्रता याचिका क्रमांक 19 मधील परिच्छेद 6 मध्ये तुम्ही नमूद केलेल्या उत्तरामधील सदसद्विवेकबुद्धीनप्रमाणे तुम्ही राहुल नार्वेकर यांना मतदान केले, हे खरे आहे का? 

कदम – हे रेकॉर्ड वर आहे

कामत – Yogeshkadam1986@outlook.com हा ईमेल पत्ता तुम्हाला माहिती आहे का? हा तुमचा ई-मेल आहे का? 

कदम – हा ईमेल मला माहिती नाही. हा माझा ईमेल आयडी नाही. 

कामत – महाराष्ट्र विधानसभा सदस्यांची यादी असलेली नोंदवही साक्षीदारास दाखवण्यात यावी. या यादीमधील शिवसेना सदस्यांची नावे असलेल्या पानावर योगेश कदम यांच्या  नावापुढे Yogeshkadam1986@outlook.com हा ईमेल आयडी दिलेला आहे. हा तुमचा ईमेल आयडी आहे का? 

कदम – नाही. हा माझा ईमेल आयडी नाही. 

कामत – तुम्हाला दाखवलेले कागदपत्रे पाहा. हे तुम्हांला ईमेलवर मिळाले, हे खरे आहे का? 

कदम – नाही, हे खरे नाही.

कामत – 3 जुलै 2022 रोजी होणाऱ्या विधानसभा अध्यक्ष निवडीच्या निवडणुकीच्या मतदानासाठी तुम्हाला व्हीप पाठवण्यात आला होता. हे खरे आहे का? 

कदम – नाही, हे खरे नाही. 

कामत – तुम्हाला 2 जुलै 2022 रोजी सुनील प्रभू यांनी 4 जुलै 2022 रोजी होणाऱ्या बहुमत विश्वास दर्शक ठरावासाठी मतदान करण्यासाठी बजावलेला व्हीप मिळाला, हे खरे आहे का? 

कदम – हे खरे नाही. 

कामत – विधानसभा अध्यक्ष यांची 3 जुलै 2022 रोजी निवड झाल्यानंतर त्यांनी भरत गोगावले यांनी भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद म्हणून मान्यता दिली. हे खरे आहे का? 

कदम – हे रेकॉर्डवर आहे

कामत – तुम्ही तुमच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेले 3 जुलै 2022 रोजीचे महाराष्ट्र विधानसभा सचिवालयाने पाठवलेले पत्र तुम्हाला नेमके कधी मिळाले? 

कदम – मला आठवत नाही.


कामत – असे म्हणता येईल का? की 3 जुलै 2022 रोजी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत तुम्ही कुठलाही व्हीप न पाळता तुम्ही तुमच्या सदसद्विवेकबुद्धीने मतदान केले. 

कदम – माझा अधिकार आहे, कोणाला मतदान करायचे. मी त्या दिवशी तो अधिकार वापरला.

कामत –  तुम्ही तुमच्या पक्षादेशाला बांधिल आहात. आणि तुमच्या मनाने मतदान करू शकत नाही, हे खरे आहे का ?

(या प्रश्नावर पुन्हा एकदा आक्षेप घेण्यात आला आहे. योगेश कदम यांना पुन्हा सभागृहाबाहेर थांबवण्यात आले आहे)

कदम – माझ्या अधिकारानुसार मी मतदान केले; याचा अर्थ असा होत नाही की मी शिवसेनेच्या आदेशाविरोधात मतदान केले.

कामत – भरत गोगावले यांनी 3 जुलै 2022 रोजी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी कुठला व्हीप काढला होता का? 

कदम – मला आठवत नाही

कामत – मी तुम्हांला सांगतो की भरत गोगावले यांनी त्या दिवशी अध्यक्ष निवडणुकीवेळी  कुठलाही व्हीप बजावला नव्हता. हे खरे आहे का? 

कदम – मला आठवत नाही. 

कामत – राजन साळवी हे शिवसेनेचे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उमेदवार होते, हे तुम्हांला माहिती होते का? 

कदम – नाही, मला माहिती नव्हते. 

कामत – अध्यक्षपदाच्या निवडणुकीत किती उमेदवार उभे होते? 

कदम – मला आठवत नाही. 

कामत – (साक्षीदारास कागदपत्रे दाखवा)  राजन साळवी हे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार होते, हे आता तुम्हाला माहिती झाले का? 

कदम – शिवसेनेच्यावतीने ते उमेदवार होते किंवा नाही याची मला खात्री नाही.

कामत -राजन साळवी हे 2019 मध्ये शिवसेना राजकीय पक्षाच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले का? 

कदम – होय. 

कामत – जर तुम्हाला माहिती असते की राजन साळवी हे 3 जुलै 2022 रोजी झालेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार आहेत, तर तुम्ही त्यांना मतदान केले असते का? 

कदम – मला यावर कुठलीही टिप्पणी करायची नाही. 

कामत – राजन साळवी यांच्या विरोधात 3 जुलै 2022 रोजी मतदान केल्यामुळे तुम्ही शेड्युल्ड 10 नुसार अपात्र होऊ शकता? 

कदम – हे खरे नाही. 

कामत – भरत गोगावले यांनी 4 जुलै 2022 रोजी बजावलेला व्हीप तुम्हाला कधी मिळाला? 

कदम – मला आठवत नाही

कामत – या कथित व्हीप स्विकारताना तुम्ही कुठली पोचपावती दिली होती का? 

कदम – मला आठवत नाही. 

कामत – भरत गोगावले यांनी 4 जुलै 2022 रोजी कुणालाही व कुठलाही व्हीप बहुमत प्रस्तावात मतदान करण्यासाठी बजावला नव्हता. 

कदम – हे खरे नाही. 

कामत – सुनील प्रभू यांनी 2 जुलै 2022 रोजी बजावलेल्या व्हीपचे तुम्ही उल्लंघन केले. हे खरे आहे का? 

कदम – हे खरे नाही. 

कामत – भरत गोगावले यांनी जो कथित व्हीप 4 जुलै 2022 रोजी बजावला होता, तो त्यांनी बजावलेला पहिला व्हीप होता. 

कदम – मला आठवत नाही

कामत – 22 जून 2022 रोजी तुम्ही कुठे होता? 

कदम – मी मुंबई बाहेर होतो.

कामत – मुंबई बाहेर कुठे होता

कदम – मी सकाळी सुरतला होतो. त्यानंतर त्याच दिवशी रात्री मी गुवाहाटीला गेलो. 

कामत – तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या सोबत सुरतला व नंतर गुवाहाटी ला गेला होता? 

कदम – होय

कामत – तुम्ही किती दिवस गुवाहाटी ला होता? मुंबईत कधी परतलात?

कदम – मुंबईत कधी परतलो, मला त्याची नेमकी तारीख आठवत नाही. मी किती दिवस गुवाहाटी येथे होतो, हे सुद्धा आठवत नाही.


कामत – तुम्ही एकनाथ शिंदे  व त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांसोबत सुरत आणि गुवाहाटी येथे होता? 

कदम – नाही, मी एकनाथ शिंदे यांना 22 जून रोजी रात्री गुवाहाटी येथे भेटलो. 

कामत – तुम्ही गुवाहाटीला होता, तेव्हा इतर आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत होते का? 

कदम – होय

कामत – त्यांच्या सोबत किती आमदार होते? 

कदम – माझ्यासह 39 आमदार. 

कामत – तुम्ही गुवाहाटीला जाण्यासाठी विमानाची तिकिटे स्वतः काढली का? त्याचे पैसे तुम्ही स्वतः अदा केले का? 

कदम – ही माझी वैयक्तिक माहिती आहे. मला ती उघड करायची नाही. 

कामत – तुम्ही, एकनाथ शिंदे आणि इतर आमदार हे गुवाहाटी येथे एकाच हॉटेलमध्ये वास्तव्यास होता, हे खरे आहे का? 

कदम – होय

कामत – तुम्हाला हॉटेलचे नाव आठवते का? 

कदम – नाही

कामत – गुवाहाटी येथील हॉटेलची बुकिंग एकनाथ शिंदे किंवा भाजपने केली होती का? 

कदम – ही माझी वैयक्तिक माहिती आहे. मला याबाबत अधिक बोलायचे नाही.


कामत – गुवाहाटी येथील भाजपचे सरकार एकनाथ शिंदे व त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांना संरक्षण देत होते का? 

कदम – मला वाटत नाही

कामत – 20 जून ते 30  जून 2022 दरम्यान एकनाथ शिंदे यांनी तिथे भाजप सोबत सरकार स्थापन करण्यासाठी एखादी राष्ट्रीय कार्यकारिणी आयोजित केली होती का? 

कदम – मला आठवत नाही

कामत – 20 ते 30 जून 2022 या काळात एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करण्यासाठी कुठलीही राष्ट्रीय कार्यकारिणी बोलावली नाही. म्हणून तुम्हाला काही आठवत नाही. 

कदम – हे खरे नाही. 

कामत – एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापनेसाठी 20 ते 30 जून 2022 दरम्यान कुठली प्रतिनिधी सभा बोलावली होती का? 

कदम – हे खरे नाही.

कामत – मला असे नमूद करायचे आहे की, बहुसंख्य आमदारांना पाठिंबा देण्याचा तुमचा निर्णय शिवसेनेचे निर्णयाच्या आणि आदेशाच्या विरोधात होता.

कदम – हे खरे नाही.

कामत – एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याच्या तुमच्या निर्णयामुळे शिवसेनेच्या सरकारला जून 2022 रोजी पायउतार होण्यास भाग पडले. 

(या प्रश्नावर शिंदे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी राजीनामा दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने यावर निरीक्षण नोंदवले आहे) 

कामत – त्यांनी हा दावा फेटाळावा. 

कामत – त्यांनी हा दावा फेटाळावा

कदम – नाही. हे खरे नाही. 

कामत – एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला तुमचा अद्याप पाठिंबा आहे का? 

कदम – होय

फेर तपासणी करताना प्रश्न

शिंदे गटाचे वकिल – तुमचा ई- मेल आयडी सांगा? 

कदम- Yogesh_kadam1986@outlook.com

कामत – तुम्ही तुमचा चुकीचा मेल आयडी दुरुस्त केला होता का? 

कदम – मला माहिती नव्हते, त्या नोंद वहीमध्ये  माझा चुकीचा ई-मेल आयडी नोंदवला आहे. 

कामत – तुम्ही विधानसभा सचिवालयास त्यांच्या अधिकृत नोंदवहीत तुमचा योग्य ई-मेल आयडी नोंदवण्यास का सांगितले नाही. 

कदम – मी सांगितले की मला चुकीचा ई-मेल आयडी प्रसिद्ध झाल्याचे माहिती नव्हते.

शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांची साक्ष संपली

उद्या सकाळी 8. 30 ते 11. 30 वाजेदरम्यान खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष नोंदवण्यात येणार.