महाराष्ट्र पोलीस दलातील 17 हजार पदांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. कारागृह विभागातील एक हजार 800 पदांसाठी तीन लाख 72 हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. 19 जूनपासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
राज्यात 19 जून पासून पोलिस भरतीला सुरूवात होतं असून 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. बँड्समन पदासाठी 41 जागा उपलब्ध असून त्यासाठी 32 हजार 26 जणांनी अर्ज केले आहेत. तुरूंग विभागातील शिपाई या पदाच्या एका जागेमागे सुमारे 207 उमेदवार स्पर्धेत आहेत. या पदासाठी 1800 जागा उपलब्ध असून 3 लाख 72 हजार 354 अर्ज आले आहेत. चालक पदासाठी 1686 जागा उपलब्ध असून 1 लाख 98 हजार 300 अर्ज (एका जागेमागे 117) आले आहेत. सर्वाधिक जागा आणि सर्वाधिक अर्ज पोलीस शिपाई पदासाठी आहेत. 9595 जागांसाठी 8 लाख 22 हजार 984 अर्ज आले असून एका जागेसाठी साधारण 86 उमेदवार,असं याचं गुणोत्तर आहे.
शीघ्र कृती दलातील 4 हजार 349 जागांसाठी 3 लाख 50 हजार 592 अर्ज (एका जागेसाठी 80 उमेदवार) आले आहेत. अर्जदारांमध्ये 40 टक्के उमेदवार हे उच्चशिक्षित असून शासकिय नोकरीचे आकर्षण आणि अन्य क्षेत्रात घटलेल्या संध्यांच्या पार्श्वभूमिवर अर्ज आले असावेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे वातावरण आहे. भरती प्रक्रिये दरम्यान पाऊस पडल्यास त्या विदयार्थ्यांना पुढील तारीख दिली जाणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.
तर उमेदवारानं एका पदासाठी एकदाच फॉर्म भरणं अपेक्षित असून विविध पदांसाठी फॉर्म भरल्यास दोन्ही ठिकाणच्या मैदानी आणि परीक्षेची तारीख एक येणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. कोल्हापूर पोलीस दलातील शिपाई पदाच्या 154 आणि पोलीस चालक पदाच्या 59 जागांसाठी 19 ते 27 जून दरम्यान भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. पोलीस मुख्यालया जवळील पोलीस परेड ग्राउंडवर ही भारतीय प्रक्रिया होणार असल्याची माहिती कोल्हापूचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे.
शिपाई पदाच्या 154 जागांसाठी 6 हजार 677 तर शिपाई पदाच्या 59 जागांसाठी 4668 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यावेळी पहिल्यांदाच उमेदवारांच्या शारीरिक चाचणी आरएफआयडी या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. शिवाय एकाच वेळी दोन ठिकाणी अर्ज उमेदवारांना देखील प्रमाणपत्र देऊन चार दिवसांची मुदत दिली जाणार असल्याचं महिंद्र पंडित यांनी म्हटलंय. पोलीस भरती दरम्यान उमेदवारांच्या शारीरिक चाचणी वेळी पावसाचा अडथळा आल्यास ही शारीरिक चाचणी कसबा बावडा ते शिये या मार्गावर घेण्याची पर्यायी व्यवस्था देखील करण्यात ची माहितीसुद्धा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे.