विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते (अजित पवार गट) वैभव पाटील यांना शिवसेना ठाकरे गटाने सांगली येथील खानापूर-विटा मतदारसंघांतून उमेदवारीची ऑफर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी नुकतीच दिली आहे.त्यामुळे खानापूर-विटा मतदारसंघात महायुतीमधून वैभव पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही तर ते बंडखोरी करणार की? ठाकरे गटाची ऑफर स्विकारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सांगलीच्या खानापूर-विटा मतदारसंघांमध्ये महायुतीत आता जागेवरून ओढा-ओढी सुरू झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांचा हा मतदारसंघ आहे. या जागेवर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दावा केला आहे.
आता जागा वाटपात काय हाेते हे नंतरच समजेल.सध्या तरी शिवसेना ठाकरे गटाकडून वैभव पाटलांना पक्षात येण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. महाविकास आघाडीमध्ये खानापूर-विटा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाकडे असल्याचा दावा करत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी वैभव पाटील यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारीची ऑफर दिली आहे. त्यामुळे खानापूर-विटा मतदारसंघ आता चर्चेचा विषय झाला आहे.