खासदार धैर्यशील माने यांची ग्वाही…….

नागपूरला थेट गोव्याशी जोडणारा शक्तीपीठ महामार्ग आता अडचणीत आला आहे. या महामार्गाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून विरोध वाढत आहे. यादरम्यान जनतेच्या भावनेचा विचार करून, विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे नेला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.मात्र त्यावरून शेतकऱ्यांचे समाधान झालेले दिसत आहे. यादरम्यान खारदार धैर्यशील माने यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी संसदेमध्ये आवाज उठवू, असे आश्वासन दिले आहे.

माने यांनी हे वक्तव्य सांगली येथे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असणाऱ्या सर्व पक्षीय महामार्गाविरोधातील धरणे आंदोलनात केले. यावेळी खासदार विशाल पाटील, काँग्रेस आमदार विश्वजित कदम, आ. विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होतेगेल्या आठवड्यातच कोल्हापूरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी शक्तिपीठ महामार्गाविरोधात विराट मोर्चा काढला होता. याची धग अद्याप कमी झालेली नाही.

यादरम्यान सांगलीत शक्तीपीठ महामार्गाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी धरणे आंदोलन केले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने तेथे उपस्थित होते. यावेळी माने यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत या आंदोलनास पाठिंबा दिला. तसेच शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलू असे सांगितले. त्याचबरोबर महामार्गाविरोधात संसदेमध्ये आवाज उठवू अशीही ग्वाही माने यांनी दिली.