गुहागर-विजापूर महामार्गावरील खानापूर महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जाते. खानापुरात दवाखाने, औषध दुकाने, शिक्षण संस्था, राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, कापड दुकाने, कृषी दुकाने, सोन्या-चांदीच्या दुकानांची संख्या मोठी असल्याने आजूबाजूच्या गावातील लोक खरेदीसाठी व कामानिमित्त खानापूरला येतात. गोरेवाडी परिसरातील विद्यार्थीही खानापूर येथील हायस्कूल व कॉलेजमध्ये येतात. गोरेवाडी येथील नागरिकांची दैनंदिन कामानिमित्ताने खानापूर येथे नेहमी वर्दळ असते.
गोरेवाडी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम काही दिवसांपूर्वी सुरू केले होते, मात्र सध्या हे काम अपूर्ण अवस्थेत सोडून देण्यात आले आहे. रस्त्यावर सगळीकडे वीस ते पंचवीस फुटापर्यंत नवीन डांबरीकरण करून दहा ते पंधरा फूट जुना रस्ता आहे तसाच सोडून दिला आहे. खानापूर- गोरेवाडी रस्त्याच्या अर्धवट कामामुळे लोकांचे प्रचंड हाल सुरु आहेत. या रस्त्यावरून प्रवास करणे कठीण बनले आहे.
खानापूर तालुक्यातील खानापूर-गोरेवाडी रस्त्याच्याम दुरुस्तीचे काम अर्धवट असल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. तीन किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे सलग डांबरीकरण केलेले नाही. काही अंतर डांबरीकरण, त्यानंतर खराब रस्ता तसाच सोडुन काही अंतरावरून पुन्हा डांबरीकरण केले आहे. सलग डांबरीकरण नसल्याने तसेच रस्त्यावरील खड्डे कायम असल्याने वाहनधारक त्रस्त आहेत.
खानापूर ते गोरेवाडी दरम्यानच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अर्धवट असल्य वाहनधारकांची तारांबळ उडत आहे. या परिसरातील विद्यार्थी व नागरिकांचा विचार करून शासनाने लवकरात लवकर या रस्त्याचे डांबरीकरण व्यवस्थित पूर्ण करावे. या रस्त्याचे सलग व दर्जेदार काम व्हावे, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.