खासदार माने हे लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर प्रथमच इचलकरंजी दौऱ्यावर आले. त्यांचे शिवतीर्थ येथे जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यानंतर भाजप कार्यालय भेटीवेळी कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर व शहराध्यक्ष अमृत भोसले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा खासदार झाला आहे. आता महायुतीचा आमदार झाला पाहिजे, यासाठी आतापासूनच कार्यकर्त्यांनी कामाला लागावे,असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केले.
खासदार माने म्हणाले दुसऱ्यांदा खासदार होण्यामागे इचलकरंजीचा सिंहाचा वाटा आहे. माझ्याविषयी झालेली नकारात्मक चर्चा भाजपच्या कार्यकर्त्यांनी सकारात्मक केली. यापुढे भाजप हे माझे संपर्क कार्यालय राहणार आहे. या ठिकाणी दर तीन महिन्याला जनता दरबार भरविण्यात येईल. त्यामुळे प्रश्न मुदतीत मार्गी लागण्यास मदत होईल. केंद्र आणि राज्यशासन यांच्या समन्वयातून प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. त्यासाठी माझ्याबरोबर महायुतीचा आमदार असणे आवश्यक आहे.
त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कार्यरत झाले पाहिजे. पाणी, यंत्रमाग वीज सवलत, आयजीएम रुग्णालय, पंचगंगा प्रदूषण, क्रीडा संकुल, रेल्वे, कबनूर व कोरोचीतील घनकचरा आदी प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे.खासदार माने यांनी आवडे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आमदार प्रकाश आवडे यांनी त्यांचे स्वागत केले. खासदार माने यांनी महायुतीचा आमदार करण्याचे आवाहन करताना कोणाचेही थेट नाव घेणे टाळले. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी नाव घेण्याचा आग्रह धरला. त्यावर निवडणुकीत उमेदवाराचे नाव योग्य वेळी घ्यावे लागते असे त्यांनी सांगितले, तर विजयानंतर प्रतिक्रिया देताना हाळवणकर यांचे नाव नकळत राहिल्याचे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.