शहरातील मुख्य रस्त्यावर विविध कारणांमुळे पडलेले लहान मोठे खड्डे खडीकरण व डांबरीकरण करून पॅचवर्क करण्याचे काम महानगरपालिकेच्या प्रशासनाने सुरू केले आहे. त्यामुळे शहरवासियांसह वाहनधारकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. परंतु सध्या सुरू असलेले पॅचवर्कचे काम दर्जेदार पध्दतीने करावे, अशी माफक अपेक्षा शहरवासियांतून केली जात आहे. श्री शिवतिर्थ ते कोल्हापूर नाका, श्री शिवतिर्थ ते नदीवेस पर्यंतचा रस्ता तसेच श्री शिवतिर्थ ते म. गांधी पुतळा चौक ते राजवाडा चौक मार्गे मरगुबाई मंदिर तसेच श्री शिवतिर्थ ते डेक्कन चौक पर्यंत रस्ता शहरातील सर्वात वर्दळीचे रस्ता म्हणून ओळखला जातो. सदर रस्त्यावर कायमपणे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते.
गेल्या काही वर्षांमध्ये विविध कारणांमुळे रस्त्यांची खुदाई करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. तर काही ठिकाणी लहान मोठ्या चरी पडल्या आहेत. यावरून जाताना येताना वाहनधारकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत असेल. त्यामुळे सदरचे खडे तात्काळ बुजवावेत अशी मागणी वाहनधकांसह नागरिकांतातून होत होती महानगरपालिका प्रशासनाने मध्यंतरी काळात लहान मोठ्या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून बुजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावरून वाहने जावून मोठ्या प्रमाणात धुरळा उडून त्याचा नाहक त्रास नागरिकांसह वाहनधारकांना
सोसावा लागत होता. मात्र, सध्या पावसाळ्याचे दिवस संपल्यानंतर महानगरपालिकेच्यावतीने शहरातील प्रमुख रस्त्यावर पडलेले खड्डे खडीकरण व डांबरीकरण करून पॅचवर्क करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे शहरवासियांसह वाहनधारकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
