Mansoon Rain: महाराष्ट्रात पुढील आठवडा पावसाचा, कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट

महाराष्ट्रात आता मान्सून सक्रीय होणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे. एक आठवडा पावसाने ब्रेक घेतल्यानंतर आता पुढील आठवड्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे. २३ ते २७ जून दरम्यान महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यात यलो अन् ऑरेंज अलर्ट दिला आहे. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा वाहणार आहे.

त्याचा वेग 40-50 किमी प्रतितास असणार आहे. यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ वगळता राज्यातील इतर भागात मान्सून दाखल झाला होता. यंदा कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्र आणि पुणे या भागात मान्सून वेळेआधीचा आला. त्यानंतर विदर्भात पोहचण्याआधी सात दिवस पावसाने ब्रेक घेतला.अखेर मान्सून नागपुरात २२ जून रोजी दाखल झाला. हवामान खात्याकडून नागपूरसह मान्सून विदर्भात दाखल झाल्याची घोषणा केली. नागपुरात मान्सूनच्या आगमनाची तारीख 16 जून होती मात्र 5 दिवसांच्या विलंबाने मान्सून दाखल झाला.

केरळनंतर कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहुतेक भागात मान्सून यापूर्वीच दाखल झाला होता. पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस दाखल झाल्याने खरीप पेरणीला गती येणार आहे. बंगालच्या उपसागरात तसेच अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्याने मान्सूनच्या ढगांनी जोर पकडला.पुढील तीन ते चार दिवस नागपुरात चांगला पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.