इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहीला आहे. इचलकरंजीतील राजकारणाचे पडसाद जिल्ह्यात उमटतात. यंदाचीही विधानसभा निवडणूक चांगलीच रंगली. अपक्ष आम.प्रकाश आवाडेंसह राहूल आवाडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपाने राहूल आवाडे यांना उमेदवारी जाहीर केली. तर महाविकास आघाडीतर्फे मदन कारंडे यांना उमेदवारी मिळाली. अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळख असलेले विठ्ठल चोपडे हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात एकूण १३ उमेदवार रिंगणात राहिले.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीने ६९.६८ टक्के मतदान झाले. मतमोजणी शनिवार ता. २३ रोजी येथील राजीव गांधी सांस्कृतिक भवनमध्ये होणार आहे. आमदार कोण होणार? यावर मतदारांबरोबर कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तर मतदारसंघात आपलाच उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा करीत लहान मोठ्या पैजा लागू लागल्या आहेत. आमदारकीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे मतदारसंघासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच महायुतीतर्फे राहूल. महाविकास आघाडीतर्फे मदन कारंडे व अपक्ष उमेदवार म्हणून विठ्ठल चोपडे हे आपले नशीब आजमावत आहेत. प्रत्येकजण विजयाची खात्री देत असला तरी मतदार संघातील मतदारांना यंदा नविन आमदार मिळणार असल्याने चर्चेचा विषय बनला आहे.