लोकसभा निवडणुकीनंतर आता तीन महिन्यांनी विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजणार आहे. ज्या मतदारांकडे मतदान कार्ड असूनही लोकसभा निवडणुकीत मतदान करता आले नाही, ज्यांनी मतदार यादीत नावच नोंदविलेले नाही, ज्यांना पत्ता, नाव यामध्ये दुरुस्ती करायचा आहे, त्यांना ९ ऑगस्टपर्यंत तो बदल करता येणार आहे.
तसेच ज्यांना १ जुलै रोजी १८ वर्षे पूर्ण होणार आहेत, त्या नवयुवकांनाही मतदार म्हणून नाव नोंदविण्याची संधी आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. पूर्वी वर्षातून एकदाच जानेवारीत १८ वर्षे पूर्ण होणाऱ्यांना अशी संधी होती, पण आता निवडणूक आयोगाने ही सुविधा १ जानेवारी, १ एप्रिल, १ जून व १ ऑक्टोबर अशा चार टप्प्यात उपलब्ध करून दिली आहे.
ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी २५ जून ते २४ जुलैपर्यंत बीएलओ घरोघरी जावून नवीन मतदार नोंदणी, मृत व दुबार मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही करणार आहेत. २५ जुलैला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून त्यानंतर ९ ऑगस्टपर्यंत मतदारांना विधानसभा निवडणुकीसाठी नाव नोंदणी करता येईल.२० ऑगस्टला विधानसभा निवडणुकीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.