राज्यात लोकसभेच्या तोफा थंडावून फार दिवस झाले नाही, तोच आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. लोकसभेत महाविकास आघाडीने मोठा उलटफेर केला आहे. महायुतीच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे. महाविकास आघाडीच्या मुसंडीने सध्या महायुतीत धुसफूस पाहायला मिळत आहे. अजितदादा पवार गटांविरोधात महायुतीत नाराजी दिसून येत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे मनोबल वाढलेले आहे.
त्यातच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर विधानसभा निवडणुकीची तारीख पण जाहीर केली आहे.जागा वाटपाची चर्चा काल होणार होती मात्र आमची काल बैठक असल्यामुळे झाली नाही लवकरच ती बैठक होईल. तिन्ही पक्ष एकत्रित बसून ठरवू की किती जागा पाहिजे. तुतारी आणि पिपाणी या चिन्हामुळे गोंधळ झाला आणि दिंडोरी लोकसभेमध्ये आमची एक लाखापेक्षा अधिक मदत तिकडे गेली त्यामुळे निवडणूक आयोगाने याच्यावर विचार केला पाहिजे.
आमच्या पक्षाकडे नवीन चेहरे तरुण मुलं आणि नवीन कार्यकर्ते यायला लागलेले आहेत त्यामुळे प्रत्येक मतदारसंघाचा विचार करून आम्ही योग्य तो विचार करू, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विविध विषयावर त्यांची मते मांडली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि निवडून आलेले आमदार विधानसभा निकालानंतर मुख्यमंत्री कोण होईल ते ठरवतील, असे ते म्हणाले. इतर पक्षांचा विचार करून सर्व निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान बोलता बोलता त्यांनी 20 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका होणार असल्याचे भाकित केले. आमचं सरकार येईल त्यावेळी यांच्या पेक्षाही उत्तम योजना आम्ही राबवू, असे आश्वासन त्यांनी दिले.