महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर जात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या काळात अनेक उद्योग गुजरातला हलवण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाकडून होत आहे. या आरोपांना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले असून त्यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोपही केले आहेत.
उदय सामंत यांचे ठाकरेंवर गंभीर आरोप…
शिंदे- फडणवीसांच्या काळात राज्यातील उद्योग बाहेर जात असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार होत आहे. या आरोपांना उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी “वेदांत फॉक्सकॉन, एअरबस टाटा आणि बल्क ड्रग पार्कसारखे मोठे उद्योग महाराष्ट्राबाहेर जाण्याला ठाकरे सरकारचं जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
“उद्योगपतींच्या घराबाहेर स्फोटक ठेवलेल्या सचिन वाजेंचे महाविकास आघाडीचे कर्तेधर्ते संजय राऊत यांनी प्रामाणिक आणि सक्षम अधिकारी म्हणून पाठराखण केली. परंतु या घटनेमुळे मुंबईची तर प्रतिमा मलिन झालीच मात्र व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण होते.. असेही सामंत म्हणाले.
याबद्दल पुढे बोलताना वाजेंच्या घटननेनंतर व्यावसायिकांना संरक्षण देण्याचे काम या सरकारने केले. विविध धोरण आणि महत्वाचे निर्णय घेत गुंतवणुकदारांना पुन्हा महाराष्ट्राकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्याचेही उदय सामंत म्हणाले.
“मोठ्या प्रकल्पांचे राजकारण करण्याऐवजी गुंतवणुकदारांना आत्मविश्वास देणे गरजेचे होते. ते काम शिंदे- फडणवीस आणि पवार सरकार करत आहे. त्यामुळे ठाकरेंनी जनतेची माफी मागायला हवी,” असेही उदय सामंत यावेळी म्हणाले.