सुरत डायमंड बोर्समुळे राज्याचे राजकारण तापले आहे. हिरे उद्योगासाठी सुरतमध्ये ही भव्य इमारत बांधण्यात आली आहे. यामुळे मुंबईतील हिरे बाजार गुजरातकडे वळवला जाईल, असा आरोप विरोधी पक्ष करत आहेत.
सुरतमध्ये बांधलेल्या सूरत डायमंड बोर्समुळे मुंबई आणि महाराष्ट्र सरकारला कराच्या रूपात मिळणारा पैसा आता मिळणार नाही. कारण मुंबईत स्थायिक झालेल्या गुजराती हिरे व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय बंद करून सुरतच्या दिशेने स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. यावरुन राज्यातील विरोधी पक्षांनी शिंदे सरकारवर टिका केली होती.
विरोधकांच्या आरोपांवर आता राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. येत्या वर्षभरात नवी मुंबईत देशातील सर्वात मोठे डायमंड सेंटर सुरू होणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. त्यासाठी धोरण तयार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.
उदय सामंत म्हणाले, डायमंड हिरे ज्वेलरी हब नवी मुबंईतच होईल, अन्य लोक टार्गेट करून बोलत आहेत, गैरसमज निर्माण करत आहेत.
देशातील मुंबई आणि सुरत या शहरांमध्ये हिरे उद्योगासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. यामुळेच सुरतमध्ये सूरत डायमंड बोर्स सुरू होत असताना महाराष्ट्रातील विरोधी पक्ष सरकारवर निशाणा साधत आहे.
जगातील 70-80 टक्के हिऱ्यांच्या व्यापारावर भारतीयांचे नियंत्रण आहे. सुरत डायमंड बोर्स येथे वन स्टॉप सोल्युशन म्हणून जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. सुरत डायमंड बाजाराचा दुसरा टप्पाही प्रस्तावित आहे.