कोल्हापूर-सांगली महामार्गावर उदगाव (ता. शिरोळ) हद्दीत रेल्वे पुलाखाली जयसिंगपूर शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्याने शुक्रवारी (ता.२७) महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. बायपास मार्गावरून वाहतूक वळविण्यात आली. तब्बल आठ तास वाहतुकीची कोंडी झाली.
तर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या. उदगांव येथील कृष्णा नदीतून जयसिंगपूर शहराला पाणी पुरवठा केला जातो. नदीतून पाणी उपसा केल्यानंतर उदगांव येथे मुख्य टाक्यापर्यत येणारी मुख्य पाईपलाईन उदगांव रेल्वे ओव्हर ब्रिजच्या खाली आहे. ही मोठी पाईपलाईन शुक्रवारी सकाळी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद झाली. त्यानंतर तातडीने पालिकेने पाणी पुरवठा बंद केला. मात्र याठिकाणी मोठा खड्डा पडल्याने कोल्हापूर-सांगली मार्गावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली.
त्यामुळे कोल्हापूर-सांगली महामार्गावरून उदगांव, जयसिंगपूर, शिरोळ, इचलकरंजी, नृसिंहवाडीकडे येणाऱ्या सर्व वाहतुकीचा मार्ग बंद झाल्याने सकाळच्या सुमारास मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यानंतर जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदिप कोळेकर यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल होवून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु केले.तसेच सांगली पोलिसांना कळवून सांगलीहून कोल्हापूरकडे येणारी वाहने कोथळी-हरीपूर पुलावरुन दानोळी निमशिरगांवमार्गे तर मिरजहून इचलकरंजी, जयसिंगपूर व इतर वाहने अर्जुनवाड-चिंचवाड-उदगांव व शिरोळ कोल्हापूर बायापास मार्गाने सोडण्यात आली.
दरम्यान, ही पाईपलाईन बदलण्याचे काम पालिकेने हाती घेल्यानंतर ही पाईप रेल्वे ओव्हेर ब्रिजच्या भिंतीखाली असल्याचे निदर्शनस आल्याने पालिकेने याठिकाणी नवीन पाईप टाकण्याचे काम घेतले आहे. सकाळच्या सुमारास वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशी, शालेय विद्यार्थी, नोकरदार, रुग्ण यांना मनस्ताप सहन करावा लागला.