यंत्रमागधारकांच्या मागण्यांबाबत वस्त्रोद्योग आयुक्तांना निवेदन!

यंत्रमाग उद्योगातील विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन राज्याचे वस्त्रोद्योग आयुक्त अविशांत पांडा यांना देण्यात आले. येथील इचलकरंजी पॉवरलमु विव्हर्स को-ऑप. असोसिएशनला पांडा यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्याशी यंत्रमाग उद्योगातील विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्यासह वस्त्रोद्योग विभागातील तांत्रिक अधिकारी उपस्थित होते.

अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी असोसिएशनच्या कामकाजाबद्दल माहिती दिली. आवाडे यांच्या हस्ते पांडा यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये यंत्रमागधारकांना जाहीर केलेली अतिरिक्त वीज सवलतीची अंमलबजावणी करावी, याचा लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची अट रद्द करावी, पाच टक्के व्याज अनुदान वितरित करावे, अस्तित्वात असलेल्या शटललेस लुमसाठी दोन टक्के व्याज सवलत सुरू करावी,

नवीन वस्त्रोद्योग धोरणामध्ये साध्या यंत्रमागाचा समावेश करावा, वीज बिलातील पोकळ थकबाकीवरील व्याज व दंड व्याज निर्लेखीत करावे, तर भरलेल्यांना परतावा मिळाला, यंत्रमाग कामगारांसाठी वेगळे कामगार कल्याण मंडळ स्थापन करावे, त्यासाठी सुतावर प्रतिकिलो १ रुपये सेस आकारण्यात यावा, अशा मागण्यात करण्यात आल्या.